मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मोठी बातमी : 'या' मराठी वृत्तवाहिनीवर माहिती व प्रसारण मंत्रालयाची कारवाई, चॅनल ३० दिवसांसाठी बंद

मोठी बातमी : 'या' मराठी वृत्तवाहिनीवर माहिती व प्रसारण मंत्रालयाची कारवाई, चॅनल ३० दिवसांसाठी बंद

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 09, 2024 10:58 PM IST

Newschannellicence suspends : केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने लोकशाही मराठी वृत्तवाहिनीचे प्रसारण ३० दिवसांसाठी बंद केले आहे.

माहिती व प्रसारण मंत्रालय
माहिती व प्रसारण मंत्रालय

लोकशाही मराठी वृत्तवाहिनीचे प्रसारण ३० दिवसांसाठी बंद करण्याचे आदेश केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. आलं आहे. सहा वाजेपासून चॅनेल बंद करण्याते आदेश दिले आहेत. काही परवानग्या नसल्याचे कारण देत मंत्रालयाकडून चॅनेलचं लायन्सस ३० दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. या निर्णयाचा मुंबई मराठी पत्रकार संघ तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी निषेध केला आहे. 

लोकशाही वृत्तवाहिनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, १४ जुलै २०२३ रोजी आम्ही एक बातमी दाखवली होती. आम्हाला ७२ तास चॅनेल बंद करण्याची नोटीस आली होती. यानंतर दिल्ली हायकोर्टात याविरोधात आम्ही अपील केले होते. आमच्या बाजुने निकाल आल्यानंतर आमच्यावरील बंदी काढून घेतली होती. पण, आता पुन्हा एकदा लोकशाही मराठीचं लायन्सस रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आज ९ जानेवारी रोजी संध्याकाळी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने लोकशाही मराठी वृत्तवाहिनाचा परवाना ३० दिवसांसाठी निलंबित करत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. काही कागदपत्रांच्या पूर्ततेचं कारण देत ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. पुढील ३० दिवसात कागदपत्रांची पूर्तता करण्याचे सांगितले आहे.

लोकशाही मराठीने एक भूमिका मांडली. स्पष्टपणे, निर्भिडपणे पत्रकारीता करण्याचे काम केले. या २६ जानेवारी रोजी आम्ही चौथा वर्धापन दिन साजरा करणार होतो. पण, गेले काही दिवस वारंवार माहिती आणि प्रसारण मंत्रालय खात्याकडून नोटीस देण्यात येत होत्या. गेल्या ४ महिन्यापासून संस्थेशी संबंधित कागदपत्रांची मागणी सरकारकडून होत होती. याची आम्ही वेळोवेळी पूर्तताही केली. १७ नोव्हेंबर २०२३ ला कारणे दाखवा नोटिशीला आम्ही उत्तर दिले. १४ डिसेंबर २०२३ रोजी मंत्रालयासमोर प्रत्यक्ष हजर राहून कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वेळ मागितला होता. मात्र ९ जानेवारी रोजी अचानक आलेल्या बंदी आदेशाने आम्ही चकीत झालो आहोत. न्यायालयीन लढाई आम्ही लढूच", असे लोकशाही चॅनलच्या निवेदनात म्हटले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, सरकारकडून हुकूमशाही सुरू आहे. निर्भिड पत्रकारीता यांना पटत नाही. याचा पक्षाच्या वतीने मी निषेध करतो. 

मुंबई मराठी पत्रकार संघ चॅनलच्या मागे ठाम -

लोकशाही वृत्तवाहिनीवर केंद्र शासनाने पुन्हा एकदा तीस दिवसांची बंदी आणली आहे. माध्यम स्वातंत्र्याचा गळा आवळण्याचा हा प्रयत्न आहे. अशा प्रकारे माध्यमांवर बंदी आणणे हे लोकशाहीला घातक असून मुंबई मराठी पत्रकार संघ या बंदीचा तीव्र शब्दात निषेध करत आहे. लोकशाही वृत्तवाहिनी मागे मुंबई मराठी पत्रकार संघ ठामपणे उभा असल्याचे संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे तसेच कार्यवाह संदीप चव्हाण यांनी म्हटलं आहे.

WhatsApp channel