लाभले आम्हास भाग्य.. ! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  लाभले आम्हास भाग्य.. ! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

लाभले आम्हास भाग्य.. ! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Published Oct 03, 2024 09:11 PM IST

Marathi Classical Language : केंद सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. गेल्या दोन दशकांपासून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी होत होती. ती आता पूर्ण झाली आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा

marathi language Now classical language : मराठी जणांसाठी आनंदाची बातमी असून केंद सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. गेल्या दोन दशकांपासून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी होत होती. अनेक सरकारकडून याचा पाठपुरावा केला जात होता. अखेर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या मागणीला मंजुरी दिली आहे.मराठीसोबतच पाली,बंगाली,आसामी आणि प्राकृतला देखील अभिजात भाषेचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयामुळे खूप वर्षांपासूनची मराठी माणसाची मागणी पूर्ण झाली आहे. केंद्र सरकारच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांच्या खासदारांनी देखील ही मागणी केली होती. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठकीत आज (गुरुवार) चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

मराठीसह पाच भाषांचा यशोचित सन्मान -

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत गेल्या अनेक दशकांपासून मागणी होत होती. आजवरच्या अनेक राज्य सरकारांनी यासाठी प्रयत्न केले होते. आज अखेर केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजाद दर्जा देण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची घोषणा केली आहे. मराठीसह एकूण पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. यामध्ये पाली, प्राकृत, आसामी व बंगाली भाषेचा समावेश आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित होता. आजवरच्या अनेक सरकारांनीकेंद्राकडे यासाठी प्रयत्न केला होता. ठाकरे सरकारच्या काळात यासाठी अनेकदा प्रयत्न झाले मात्र आता सर्व प्रयत्न फळाला आले असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे

मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया –

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला! एका लढ्याला यश आले. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरवठा केला होता. आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे आम्ही आभार मानतो. या कामात अनेक मराठी भाषक, विचारवंत, भाषेचे अभ्यासक,साहित्यिक आणि समीक्षकांचे साह्य झाले. त्यांचेही मन:पूर्वक आभार

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी मायमराठीचा सन्मान -

नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच मायमराठीला अभिजात भाषेचा बहुमान मनाला सुखद अनुभूती देणारा आहे. असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील१२कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो. आपल्या ट्विटमध्ये फडणवीसांनी म्हटले की, जगभरातील तमाम मराठीजनांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मराठीच्या इतिहासातील महत्वपूर्ण निर्णय -गडकरी

नितीन गडकरी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. माय मराठीच्या इतिहासातील हा एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय आहे.

 

मराठी लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आहे. हा दिवस उजाडावा याची वाट प्रत्येक मराठी माणूस पाहत होता. आम्ही गेली अनेक वर्षे यासंदर्भातील पाठपुरावा करत होता. मराठी माणसाच्या लढ्याला आज यश आले”, अशी भावना साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर