Raj Thackeray: मराठी भाषा गौरव दिनाच्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची खास पोस्ट
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raj Thackeray: मराठी भाषा गौरव दिनाच्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची खास पोस्ट

Raj Thackeray: मराठी भाषा गौरव दिनाच्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची खास पोस्ट

Feb 27, 2024 01:21 PM IST

Marathi Bhasha Diwas 2024: दरवर्षी २७ फेब्रुवारीला राज्यात 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा केला जातो

Raj Thackeray
Raj Thackeray

Marathi Language Day: दरवर्षी २७ फेब्रुवारीला राज्यात 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा केला जातो. 'कुसुमाग्रज' अर्थातच महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिनी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आजच्या खासदिनी महाराष्ट्रातील जनतेसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

"सर्वप्रथम महाराष्ट्रात, देशांत आणि जगभरात पसरलेल्या तमाम मराठी जनांना 'मराठी भाषा गौरव दिनाच्या' खूप खूप शुभेच्छा. मराठीत बोलणं, ह्या भाषेत नवनवीन ज्ञान, विचार, कल्पना जन्माला घालणं आणि त्यातून आपल्या भाषेची ताकद, त्याचा पैस, ह्याची जगाला जाणीव करून देणं ह्यातून आपण एक प्रकारे मराठी भाषेचा गौरव करतोच आणि खरंतर अशाच पद्धतीने फक्त आजच नाही तर ३६५ दिवस साजरा व्हायला हवा. मागे मी म्हणलं तसं की मराठी ज्ञानाची भाषा व्हायला हवी. पण हे होत असताना बदलत्या प्रवाहांचा विचार व्हायला हवा. आजची तरुण पिढी दिवसातील बहुसंख्य वेळ विविध समाज माध्यमांवर असते. त्यातले अगदी सगळे नाही पण बऱ्यापैकी तरुण-तरुणी हे सामान्य दर्जाचे रिल्स बघण्यात त्यांचा वेळ घालवत असतात", असे राज ठाकरे म्हणाले.

"पण ह्याच सगळ्यांना विज्ञान ते आर्थिक संकल्पना ते अनेक विषयांवरचं माहिती, ज्ञान मराठी भाषेत मिळालं तर ते नक्की बघतील. मला माहीत आहे की आज मराठीमध्ये युट्युबसाठी खूप दर्जेदार कन्टेन्ट तयार होत आहे पण त्याचं प्रमाण निश्चित कमी आहे. आज विविध क्षेत्रांत खूप उच्च पदांवर काम करणारी मराठी माणसं आहेत. त्यांचा त्यांच्या क्षेत्रातील अभ्यास उत्तम आहेच आणि फक्त त्यांचं ज्ञान, माहिती ही जर रंजक पद्धतीने त्यांनी या समाज माध्यमांवर सांगितली तर?"

पुढे राज ठाकरे म्हणाले की, विकिमीडिया फाउंडेशनचं, 'विकिपीडिया' तर आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं. ह्याच विकिमिडीया फाउंडेशनच्या 'विकिसोर्स', 'विकीमीडिया कॉमन्स', 'विकिव्हॉयेज', 'विकिस्पिशिज' सारख्या आभासी मंचांचा वापर ज्ञान मराठीतून देण्यासाठी करणं सहज शक्य आहे. विकिमिडीया सारख्या आभासी मंचावर तर ध्वनी, चित्रफीत स्वरूपात पण ज्ञान माहिती प्रसारित करणं शक्य आहे. ह्या सगळ्याचा मुक्त आणि प्रभावी वापर व्हायला काहीच हरकत नसावी."

Manoj Jarange Patil: जरांगे पाटलांच्या आंदोलनाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश

मराठी भाषेचं काय होणार ह्यावर आक्रोश करण्यापेक्षा, लोकांच्या बदलत्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यानुसार स्वतःला बदलणं हे अतिशय आवश्यक आहे. मध्यंतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोशल मीडियावर लोकप्रिय असणाऱ्या मराठी इन्फ्ल्यूअन्सर्सचा सत्कार केला होता. पण मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन समाजमाध्यमांवर मराठी ही ज्ञानाची भाषा बनवणाऱ्यांचा सुद्धा योग्य आदर व्हायला हवा. ह्यासाठी नेहमीप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढाकार घेईलच!, असेही राज ठाकरे म्हणाले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर