Book Review : लेखनगंगेवरचा सुबक देखणा ज्ञानघाट
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Book Review : लेखनगंगेवरचा सुबक देखणा ज्ञानघाट

Book Review : लेखनगंगेवरचा सुबक देखणा ज्ञानघाट

HT Marathi Desk HT Marathi
Updated Feb 12, 2025 05:51 PM IST

इब्राहीम अफगाण यांनी लिहिलेले ‘ललित लेखनातील मूळ घटक आणि घाटांच्या चर्चेचा सम्यक अभ्यास’ हे पुस्तक म्हणजे मराठी साहित्य खजिन्यातील अनमोल असे रत्न आहे.

ललित लेखनातील मूळ घटक आणि घाटांच्या चर्चेचा सम्यक अभ्यास
ललित लेखनातील मूळ घटक आणि घाटांच्या चर्चेचा सम्यक अभ्यास

 

-सुनिता तांबे

मराठी लेखकांना देशी आणि विदेशी साहित्य आणि निर्मिती तंत्रांची माहिती देत, नाना प्रकारच्या उदाहरणाची मांडणी करीत ‘अवघे करावे शहाणे लेखकजन’ या उदात्त जीवनध्येयाने प्रेरित होवून इब्राहीम अफगाण यांनी लिहिलेले ‘ललित लेखनातील मूळ घटक आणि घाटांच्या चर्चेचा सम्यक अभ्यास’ हे पुस्तक म्हणजे मराठी साहित्य खजिन्यातील अनमोल असे रत्न आहे.

सतत लेखन करणारे पट्टीचे लेखक असू देत किंवा गटांगळ्या खाणारे, नाकातोंडात पाणी जावून घाबरणारे नवशिके लेखक असू देत, सर्वांसाठी हे पुस्तक म्हणजे लेखनगंगेकाठचा सुबक, देखणा, विस्तीर्ण आणि मजबूत आखीव रेखीव घाट आहे. या शब्दघाटाच्या पायऱ्या वाचक जितक्या वेळा उतरेल, चढेल तितके ज्ञानमोती तो वेचू शकेल याची शंभर नव्हे तर हजार टक्के खात्री !

पाश्चात्य साहित्यविश्वात स्व-मदत म्हणजे How to do किंवा प्रेरणादायी तत्त्वज्ञानावर आधारित असलेली म्हणजे मोटीवेशनल पुस्तके मुबलक प्रमाणात आढळतात. मराठी भाषेत अशा प्रकारच्या मार्गदर्शकरुपी पुस्तकांचे प्रमाण नगण्य होते. मात्र गेल्या काही वर्षात अशी पुस्तके अनुवादित का असेना पण ठळकरित्या पुस्तक विक्रीच्या ठिकाणी दिसून येत आहेत. या पुस्तकांच्या मांदियाळीत शिरोभागी उठून दिसावा असा पूर्णत: अनुवादित नसलेला; अतिशय परिश्रमपूर्वक संशोधन करून संकलन, संपादन आणि सुलभ मराठी भाषेत लेखन केलेला ग्रंथ म्हणजे इब्राहीम अफगाण यांचा ‘ललित लेखनातील मूळ घटक आणि घाटांच्या चर्चेचा सम्यक अभ्यास’ !

या पुस्तकाच्या शीर्षकातच संपूर्ण पुस्तकाचे सार सामावले आहे. ललितलेखन ! कल्पनेच्या शब्दसृष्टीत जन्माला येणारे लेखन पण व्यावहारिक जगण्यातले ताणेबाणे समजून घेवून ते अनुभवण्यासाठी आणि जगणे अधिक चांगले करण्यासाठीचा उपयुक्त कलाविष्कार. मग असे दर्जेदार आणि मानवी जीवनावर भाष्य करण्याइतके सकस लिहिणाऱ्या लिहित्या हातांना काही अडचण जाणवत असेल तर त्यासाठी त्याला कुणी योग्य, जाणता गुरु नको का ? ‘ललित लेखनातील मूळ घटक आणि घाटांच्या चर्चेचा सम्यक अभ्यास’ हे पुस्तक अशा लेखनगुरूची भूमिका अगदी चोख पार पाडणारे असे झाले आहे.

पुस्तकाचा घाट समजून घेण्याआधी थोडंस लेखक इब्राहीम अफगाण यांच्याविषयी जाणून घेणे आवश्यक आहे. ‘गोमंतक’, ‘सकाळ’, ‘महाराष्ट्र टाईम्स’, ‘कृषीवल’ अशा विविध मुद्रित माध्यमासाठी पत्रकार ते संपादक म्हणून काम करणारे इब्राहीम अफगाण हे आकृष्ट झाले उत्तम पटकथाबांधणी म्हणजे नेमके काय, या विषयाकडे. पॉल नॉक्स, ह्यु हडसन, जेन चम्पियन, स्टीवन डिसोझा, श्रीधर राघवन, गोविंद निहलानी अशा लेखक-दिग्दर्शक दिग्गजांच्या कार्यशाळेत इब्राहीम अफगाण यांच्या मनात या पुस्तकाच्या निर्मितीचे बीज पेरले गेले. तत्पूर्वी ख्यातनाम उर्दू कवी पद्मश्री निदा फाजली यांच्या आत्मचरित्राचे भाषांतर करून इब्राहीम अफगाण यांनी साहित्य अकादमी पुरस्कारवर आपले नाव कोरले होतेच.'मोनार्क', ‘मोजकी उन्हे’, ‘मृत्यानुभव’ इत्यादी कादंबऱ्यानी त्यांची लेखक ही ओळख अधिक गडद केली. हिंदी, इंग्लिश, मराठी, उर्दू आणि कोकणी या पाच भाषा जाणणारे इब्राहीम अफगाण पुढे पुढे लेखकाना लिहित असताना येणाऱ्या अडचणीचा विचार करून त्या कशा सोडवता येतील, लिहित्या हाताना बळ कसे पुरवता येईल या ध्येयाने प्रेरित झाले. त्याची फलश्रुती म्हणून त्यांनी लेखकांना मार्गदर्शन करणारी 'राईटमाईंड' अकॅडमी' स्थापन केली. याच्या माध्यमातून सातत्याने कार्यशाळा घेत नवोदित तसेच प्रस्थापित लेखकांना ते मार्गदर्शन करतात. मराठीतील अनेक पुस्तकांच्या निर्मितीमध्ये इब्राहीम अफगाण यांचे योगदान मोलाचे ठरत आहे. मार्गदर्शक, प्रशिक्षक म्हणून स्वतःची जडणघडण करीत असताना मराठी लेखकांकरिता कायमस्वरूपी उपयुक्त गाईड उपलब्ध असले पाहिजे या त्यांच्या उद्देश्याची पूर्ती म्हणजे ‘ललित लेखनातील मूळ घटक आणि घाटांच्या चर्चेचा सम्यक अभ्यास’ ! हे पुस्तक होय.

पुस्तकाचे एकूण नऊ भाग आहेत. पहिला भाग प्रस्तावनेचा आहे. यात कोणत्याही लेखनाचा मूळ गाभा म्हणजे कथा, कहाणी यावर विस्तृत विवेचन आहे. मानवी जीवनातील कहाण्याचे महत्व अधोरेखित करीत असताना लेखकाने कथा कशी निर्माण होत गेली, कथेचे घटक, नायक म्हणजे कोण आणि मिथकांचा प्रभाव यावर सखोल आणि तंत्रशुद्ध प्रकाश टाकलेला आहे. त्यानंतरच्या पुढील दोन भागात कथेतील नायकाचा प्रवास कसकसा होत जातो, त्याला कोणकोणत्या अडचणी येतात, कथेचा शेवट कसा होतो याबद्दल प्रत्येक टप्पा नीटपणे समजावून देत लेखकाने याविषयीची जगभरातील साहित्यातील अनेक उदाहरणे दिली आहेत. हे दोन भाग म्हणजे या पुस्तकाचा आत्मा असे म्हणावयास हरकत नाही.

चौथ्या भागात रोनाल्ड टोबियास यांनी मांडलेले वीस प्लॉट आणि पाचव्या भागात जॉर्ज पोल्टी यांनी सांगितलेले कथेचे मूळ छत्तीस घाट या दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी सोदाहरण स्पष्ट केलेल्या आहेत. जगभरात जी काही साहित्यनिर्मिती झाली ते सर्व साहित्य या वीस प्लॉट आणि छत्तीस घाटांच्या संदर्भाने तपासता येते. सहाव्या भागात एक कादंबरी आणि नऊ सिनेमे यांच्या कथाविश्वाची उकल नायकाचा प्रवास ( हिरोज जर्नी) या आकृतीद्वारे लेखकाने रंजकरित्या केली आहे. सातव्या भागात पटकथेची मुद्देसूद बांधणी हा विषय समजावून सांगितला आहे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व महत्वाच्या तंत्रांची माहिती लेखकाने हॉलीवूड फॉर्म्युलाचा वापर करत दिलेली आहे. आठवा भाग हा उपसंहार आहे. यात मानवी जीवनातील आशावादी दृष्टिकोनाचे महत्व अधोरेखित केले आहे. नववा आणि शेवटचा भाग संदर्भ सूचीचा आहे. नुसती संदर्भ सूची जरी चाळली तरी वाचकाची छाती दडपून जाईल इतकी ती दमदार आहे.

पुस्तकाची माहिती देताना लेखनमर्यादा येत असली तरी या पुस्तकात जे ज्ञान पानोपानी सांगितले आहे ते अमर्याद आहे. हातात घेतले आणि दोनचार पाने चाळली असे हे पुस्तक नव्हे. पट्टीच्या वाचकालाही दमवेल असा हा माहितीचा खजिना आहे. सावकाश एकेक संदर्भ समजून घेत, वाचन करीत, स्वतःची टिपणे काढत काढत या पुस्तकात रमावे असा हा महत्वाचा संदर्भ ग्रंथ आहे.

फास्ट फूड मधून तत्कालीन पौष्टिकता मिळवण्याची मानसिकता ज्या वाचकांची आहे त्यांना हे पुस्तक सुरुवातीला जड जावू शकते मात्र धीराने संयम राखीत वाचन करीत राहिले तर लेखक होवू पाहणाऱ्या, लेखक असणाऱ्या दोघांच्या अडचणी हे पुस्तक समर्थपणे सोडवते. केवळ लेखकच नव्हे तर काही वेगळे वाचू पाहणारे अभ्यासू वाचक आणि चित्रपट आस्वादक या दोन्ही प्रकारच्या लोकांना हे पुस्तक आनंद देणारे ठरेल. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने अतिशय सुरेख आणि गुणवत्तापूर्ण अशी या ग्रंथांची निर्मिती केली आहे. 

पुस्तकाचे नाव : ललित लेखनातील मूळ घटक आणि घाटांच्या चर्चेचा सम्यक अभ्यास

लेखकाचे नाव : इब्राहीम अफगाण

प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई

पृष्ठसंख्या : ६३३

मूल्य : रु. ३१४

………….

(sunita4beok@gmail.com)

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर