Sharad Ponkshe : दिवाळीनंतर आताविधानसभा निवडणुकीचे राजकीय फटाके फुटू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यात प्रचारसभा पार पडली. या सभेत बोलताना अभिनेते शरद पोंक्षे यांनी जोरदार भाषण केले. यावेळी मनसेच्या व्यासपीठावरून बोलताना मी शिंदे गटाचा उपनेता फक्त नावाला आहे, असं म्हणत शरद पोंक्षे यांनी शिवसेना शिंदे गटावर अप्रत्यक्ष टीका केली.
राज्याच्या राजकारणावर भाष्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह २०१९ नंतर राज्याच्या राजकारणात घडलेल्या सर्व घडामोडींवर भाष्य केलं. शरद पोंक्षे म्हणाले की, मी शिवसेनेच्या शिंदे गटाचा उपनेता आहे पण केवळ नावापुरता. अजूनही त्याच पक्षात आहे. पण राज ठाकरे यांची आंदोलने आणि तळमळ पाहिली आणि वाटले की राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानभवनात आली पाहिजे.
राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर दुसऱ्या पक्षात गेले नाहीत. बाळासाहेबांच्या संगतीत वाढलेला हा मुलगा, ज्याच्यावर हिंदुत्वाचे संस्कार झाले आहेत. त्यांनी खूप वेळ घेतला व अनेक क्षेत्रातील लोंकाशी बोलून त्यांनी पक्ष स्थापन केला. देशासाठी गरज पडेल तेव्हा हिंदुत्वासाठी लढण्यासाठी गेली १८ वर्ष तो माणूस लढतोय. त्यांच्या तोंडून मी ऐकत आलो आहे की जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र मला घडवायचा आहे. ती वेळ आली आहे. म्हणून मला वाटले की राज ठाकरेंसाठी या माणसासाठी काही सभा घ्याव्यात, असे पोंक्षे म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना पोंक्षे म्हणाले की, सत्तेसाठी एक अख्खा पक्ष विरुद्ध विचारसरणीच्या पक्षाबरोबर जातो आणि आम्ही आमची विचारसरणी सोडलेली नाही असं म्हणतो”,अशा शब्दांत शरद पोंक्षे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर हल्लाबोल केला.
शरद पोंक्षे यांनी मतदारांना आवाहन केले की, स्वत:ची एक विचारसरणी घेऊन महाराष्ट्राला लागलेल्या रोगापासून महाराष्ट्राची तब्येत ठणठणीत करण्यासाठी आता चांगले २८८ डॉक्टर या विधानसभेत पाठवा. मी जेव्हा आजारी पडतो, म्हणजे मी शरद पोंक्षे मी ब्राम्हण आहे म्हणून ब्राम्हण जातीचाच डॉक्टर पाहतो का? नाही. मी काय पाहतो तर चांगला डॉक्टर कोण आहे हे पाहून डॉक्टरकडे जातो.
कारण मला चांगल्या प्रकारे बरं व्हायचं असतं. जेव्हा मला चांगलं व्हायचं असतं तेव्हा मी चांगल्या डॉक्टरकडे जातो. मग तेव्हा आपण जात पाहत नाही. मग आज गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र आजारी पडला आहे, तेव्हा जातपात न पाहता योग्य उमेदवारांना निवडा, असं म्हणत शरद पोंक्षे यांनी सध्याच्या राजकारणावर भाष्य केलं