Kiran Mane Join Shiv Sena UBT: सोशल मीडियावर राजकीय पोस्ट तसेच राजकीय वक्तव्यामुळे चर्चेत असणारे, मराठी बिग बॉसमुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेले मराठमोळे अभिनेते किरण माने यांनी आज शिवसेना उद्धव ठाकरे (Shiv sena Uddhav Thackeray) गटात प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून किरण माने राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी हातात शिवबंधन बांधत मशाल हाती घेतली.
बीडमधील काही कार्यकर्त्यांसह अभिनेते किरण माने यांनी शिवबंधन हाती बांधलं. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्हाला जे पाहावत नाही ते खरं आहे. माने तुमच्याकडे शब्दाची ताकद आहे. आपण दोघेही लढू. सेनेत तुम्हाला पश्चाताप होणार नाही. आलात त्याचा अभिमान वाटेल पुढेही. ही लढाई केवळ राजकारण किंवा सत्ताकारणासाठी नसून महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आहे.
ठाकरे गटात प्रवेश करत किरण माने म्हणाले, मी एक सामान्य कलाकार आहे. पक्षाकडून जी जबाबदारी मिळेल ती निष्ठेने पार पाडेन. शिवसेना सर्वसामान्यांची आहे. राजकारण गढूळ झालेलं असताना एकटा माणूस लढत आहे. त्यामुळे मी एक संवेदनशील अभिनेता तसेच माणूस म्हणून त्यांच्यासोबत येण्याचा निर्णय घेतला.
किरण माने पुढे म्हणाले, सध्या संविधान वाचवण्याची आणि लोकशाही वाचवण्याची ताकद उद्धव ठाकरे यांच्यात आहे. त्यांच्या या कामात मी त्यांच्यासोबत आहे.
किरण माने हे मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेते आहेत. 'सातारचा बच्चन' म्हणून ते ओळखले जातात. 'सिंधुताई माझी माई', 'मुलगी झाली हो' आणि 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. राजकीय पोस्ट केल्याने 'मुलगी झाली हो' या मालिकेतून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.
सोशल मीडियावर वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणाऱ्या किरण मानेंवर अनेकदा मोठ्या प्रमाणात टीका होत असते. 'बिग बॉस मराठी' शो मुळे किरण माने घराघरांत पोहोचले आहेत.
संबंधित बातम्या