मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी त्यांच्या कुणबी नोंदी शोधण्याचे काम सरकारी समितीकडे सोपवण्यात आले आहे. मात्र मराठा आरक्षण आंदोलनाची जिथून सुरुवात झाली त्या अंतरवाली सराटी गावात एकाही कुणबी नोंद आढळली नाही, विशेष म्हणजे आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या कुटूंबातही कुणबी नोंद आढळली नव्हती. यामुळे त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार की नाही, अशी चर्चा सुरू होती. मात्र आता ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण मिळवण्यासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची देखील आता कुणबी नोंद सापडली आहे.
मनोज जरांगे पाटील कुणबी असल्याची नोंदबीड जिल्ह्यातील शिरूर कासार तहसील कार्यालयामध्ये आढळली आहे. मोडी लिपीमध्ये ही नोंद आढळून आली आहे. मोडी लिपी संशोधन करणारे पथक आज शिरूर दौऱ्यावर होतं, त्या दरम्यान त्यांना मनोज जरांगे पाटील यांच्या कुटुंबातील व्यक्ती देखील कुणबी असल्याचा पुरावा सापडला आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांना देखील कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्यांचे वडील देखील आज शिरूर तहसील कार्यालयामध्ये हजर होते. नोंद मिळाल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी जुलै महिन्यापासून लढा देत आहेत. सरकारने २४ डिसेंबरची डेडलाईन न पाळल्यामुळे आता पुढचे आंदोलन २० जानेवारीपासून मुंबईत सुरू होणार आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी त्यांनी सरकारकडे लावून धरली आहे. त्यानंतर राज्यभरात कुणबी नोंदी शोधण्यात येत आहेत. आजपर्यंत लाखो कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची शक्यता आहे.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच कुणबी नोंदी शोधण्यासाठी सरकार पातळीवर एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून निजामाच्या काळापासूनची कागदपत्रं, मराठवाड्यातील मराठा समाजाची आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक स्थिती, जुने रेकॉर्ड मोडी लिपीतील नोंदीयांची पडताळणी केली जात आहे.