Maratha Reservation Survey: मुंबई महानगरपालिकेच्या ८०० हून अधिक कनिष्ठ अभियंते, उपअभियंते आणि सहायक अभियंते यांच्यावर मराठा आरक्षण सर्वेक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली. परंतु, महापालिकेतील आधीच १ हजार अभियंता पदे रिक्त आहेत आणि सेवेत असलेल्या अभियंता यांना सर्वेक्षणाच्या कामास जुंपल्यास त्याचा परिणाम अभियांत्रिकी कामांवर होईल, यामुळे त्यांना या कामातून वगळण्यात यावे अशी मागणी करणारे पत्र मुंबई महानगर पालिका अभियंते युनियनने आयुक्तांना लिहिले आहे.
अभियंता व अन्य खात्यांमध्ये एकूण चार हजार पदे आहेत. त्यापैकी एक हजार पदे रिक्त आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या पदांवर भरती झाली नाही. मात्र, आधीच कामाचा अतिरिक्त भार असताना सेवेत असलेल्या अभियंत्यांवर मराठा आरक्षण सर्वेक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली. तसेच सहायक अभियंता पर्यवेक्षक आणि कनिष्ठ अभियंता यांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अभियंता युनियनने आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात असे लिहिले आहे की, "मुंबई महानगरपालिकेतील अभियंत्यांची तांत्रिक कामासाठी नेमणूक केली असता त्यांच्यावर मराठा आरक्षण सर्वेक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र, याचा परिणाम शहरातील नागरी सेवा सुविधांवर होऊ शकतो. यामुळे त्यांना सर्वेक्षणाच्या कामातून वगळण्यात यावे, अशी विनंती आहे."