Manoj Jarange Maratha protest : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी ८ जून पासून सुरू केलेले उपोषण मागे घेतले आहे. काल त्यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिल्यावर सरकारने जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली. या साठी मंत्री शंभुराज देसाई त्यांच्या भेटीला गेले. मात्र, या ठिकाणी जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप केला. मराठा आंदोलनाच्या नावाखाली १०० कोटी रुपये कुणी लाटले असा खळबळजनक आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे आता चर्चाना उधाण आले आहे. जरांगे पाटील यांनी या प्रकरणी शंभुराज देसाई यांच्याकडे चौकशीची मागणी देखील केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत पुन्हा उपोषण सुरू केले होते. यावेळी सरकारने जर मागण्या मान्य केल्या नाही तर विधानसभा निवडणुकीत ठरवून सर्वांचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला होता. त्यामुळे सरकारने जरांगे पाटील यांच्याशी चर्चेची दारे पुन्हा सुरू केली आहे. दरम्यान, त्यांनी गुरुवारी ६ दिवसांपासून त्यांचे सुरू असलेले उपोषण मागे घेतले.
राज्य सरकारकडून मंत्री शंभूराज देसाई, राणा जगजितसिंह व खासदार संदिपान भुमरे यांनी गुरुवारी जरांगे पाटील यांची भेट घेतली. मनोज जरांगे यांनी तब्येतीची काळजी घ्यावी व मराठा आरक्षणावर निर्णय घ्यायला एक महिना वेळ द्यावा अशी विनवणी या शिष्टमंडळाने पाटील यांना केली.
मनोज जरांगे पाटील यांनी शिष्टमंडळाची विनंती मान्य करत सरकारला १३ जुलैपर्यंतची वेळ दिली आहे. सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसंबंधी सरकारची मानसिकता नाही हे जरांगेंनी डोक्यातून काढून टाकावं, शिंदे साहेबांनी त्यांना शब्द दिला आहे, असे शंभुराज देसाई यांनी सांगितलं. यावर जर सरकारने एक महिन्याच्या आत मागण्या मान्य केल्या नाही तर विधानसभा निवडणूक लढणार असल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. या सोबतच त्यांचे नाव सांगून ज्यांनी पैसे लाटले त्याची मला यादी द्या, अशी मागणी देखील जरांगे पाटील यांनी शिष्टमंडळाकडे केली. ज्या माणसाने १०० कोटी घेतले, त्या व्यक्तीचे नाव माहिती असून वेळ आल्यावर हे नाव जाहीर करणार असल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.