सरसकट मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी ते मुंबई मोर्चा काढला आहे. आझाद मैदानाकडे निघालेल्या जरांगेंनी सरकारला आरक्षणाचा अध्यादेश काढण्यासाठी शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. तोपर्यंत त्यांनी नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये तळ ठोकला आहे. सरकारने अध्यादेश काढला नाही तर शनिवारी दुपारी १२ वाजता मुंबईकडे निघणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
जरांगे पाटलांच्या इशाऱ्यानंतर राज्य सरकारकडून हालचालींना वेग आला आहे. आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून वेगाने पावले उचलली जात आहेत.नोंदी मिळालेल्या लोकांच्या सगेसोयऱ्यांनाही प्रमाणपत्र वाटप करावे अशी मागणी करत याचा अध्यादेश सरकारने तातडीने काढावा अशी मागणी केली होती. यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांची तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावली. त्यात जरांगे पाटील यांनी आज केलेल्या मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. त्याशिवाय सुरक्षेच्या बाबतीतही मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. मनोज जरांगे पाटील यांनी ज्या मागण्या केल्या आहेत. त्यातील बहुतांश मुद्द्यांवर तोडगा निघाल्याची माहितीमिळत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा बंगल्यावर पार पडलेल्या बैठकीत नवा अध्यादेश तयार करण्यात आला आहे. ही बैठक तब्बल चार तास चालली. या बैठकीला मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे उपस्थित होते.
मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने नवीन अध्यादेश घेऊन राज्य सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी वाशीकडे रवाना झाले आहे. या शिष्टमंडळात सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, औरंगाबादचे विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड, मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे,खाजगी सचिव डॉ. अमोल शिंदे आणि सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या शिष्ट मंडळाकडून नवीन अध्यादेश आणि इतर मागण्यांसंदर्भात झालेल्या चर्चेचा तपशील जरागेंना दिला जाणार आहे.
संबंधित बातम्या