राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचे विधेयक मंजूर केल्यानंतर मनोज जरांगे यांनी याला विरोध करत आपल्या पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. त्यातच आता त्यांचे आंदोलनातील सहकारी अजय महाराज बारसकर यांनी त्यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. जरांगे यांनी दररोज आपली वक्तव्ये बदलली. ते नेहमी खोटं बोलतात. जरांगे कॅमऱ्यासमोर बोलतात ते पारदर्शक आहेत, असं समजून जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. मात्र त्यांनी २३ डिसेंबर रोजी पहिल्यांदा कन्हया हॉटेलमध्ये सरकार प्रतिनिधींसोबत पहिली गुप्त भेट घेतली, असा धक्कादायक खुलासाही बारसकर यांनी केला आहे.
अजय महाराज बारसकर म्हणाले की, जरांगे यांना मी पाटील म्हणणार नाही. त्यांच्या हेकेखोरपणामुळे मराठा समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. जरांगेंच्या प्रत्येक कृतीला मी साक्षीदार आहे. तुमच्याकडे बहुमत असलं तरी मी सत्य सांगणार असं त्यांनी म्हटलं.
बारसकर म्हणाले की, मी जरांगेंच्या प्रत्येक कृतीचा साक्षीदार आहे. त्यांचे १०० अपराध भरले. जरांगेने माझ्या तुकोबारायांचा अपमान केला. स्टेजवर कशासाठी गेलो आणि जरांगेंना म्हटलं की पाणी पाणी प्या, जरांगे पाटील पाणी प्या. लहान लेकरू गेलं त्यांनी पाणी नेलं, मी देहूवरून आलो पाणी प्या असंही म्हटलं मी. जरांगे विचार करतायत पाणी पिऊ की नको? मी याच्या हातून पाणी प्यायलो तर मोठा होईल असं त्यांना वाटलं. अहंगंड वाटला म्हणून ते पाणी प्यायले नाही. मला सांगू नको, संत नी फंत हे सांगू नको असं जरांगे म्हणाले.
जरांगे कसा पलटी मारतो, रोज पलटतो जरांगे, खोटं बोलतो. तरी जरांगेवर मराठ्यांनी का विश्वास ठेवला? कोणतीही मिटिंग कॅमेऱ्यासमोर बोलतात, पण जरांगेंनी २३ डिसेंबरला पहिली गुप्त मिटिंग कन्हैय्या हॉटेलला घेतली. त्या बंद खोलीत आम्ही बोलत होतो. मी साक्षीदार आहे त्याचा. ते कॅमेऱ्यासमोर एक बाहेर एक बोलतात. असा आरोपही बारस्कर यांनी केला आहे.
जरांगेंची दुसरी गुप्त मिटिंग झाली, जरांगेंनी २० जानेवारीची घोषणा केली. ही तारीख कुणी दिली. सरकारचे लोक होते, ड्राफ्ट वाचून दाखवला. तो १८ जानेवारीचा आहे. तोच ड्राफ्ट पुढे गेल्यानंतर वाशीला स्वीकारला. जाताना पुन्हा मिटिंग करणार नाही म्हणाले होते. रांजणगाव गणपती येथे एका बंगल्यावर पहाटे ४ ते ६ एका उच्च पदस्थ अधिकाऱ्यासोबत मिटिंग केली. त्याने रेकॉर्ड करून ठेवलीय. त्याच अधिकाऱ्याची एका गाडीत अर्धातास मिटिंग झाली. लोणावळ्याची मिटिंग माहितीय. म्हणजे हा पारदर्शक माणूस नाही असंही बारस्कर म्हणाले.
वाशीच्या भाजी मार्केटमध्ये जरांगे पाटील यांनी कंटेनरवर भाषण करताना म्हणाले की, आझाद मैदानात आंदोलन करायचं. आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटायचं नाही. त्यानंतर जरांगे भाषणात पुन्हा म्हणाले की, सरकारने आपल्याला लवकर जीआर दिला पाहिजे. त्यावेळी सरकरच्या वतीने सेक्रेटरी भांगे तेथे उपस्थित होते. त्यांनी लगेचच सांगितलं की १५ मिनिटांत जीआर, अध्यादेश देतो. यावेळी मला वाटले की, काहीतरी शिजतंय.
त्यानंतर जरांगे पाटील म्हणाले की, १५ मिनिटांत जीआर मिळणार आहे. १५ मिनिटात कसा काय जीआर मिळू शकतो. असं नाटक जरांगेंनी केल्याचा किस्सा बारसकर यांनी सांगितला. अजय महाराज बारसकर यांच्या या पत्रकरा परिषदेनंतर मराठा आंदोलनात फुट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.