मराठा व कुणबी एकच असून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे दोन वेळा उपोषण करून सरकारला जेरीस आणले होते. सरकारने २४ डिसेंबरची डेडलाईन न पाळल्यामुळे येत्या २० जानेवारीपासून जरांगे मुंबईतील आझाद मैदानावर पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. त्यातचएक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनोज जरांगे यांच्या कुटुंबातच एकही कुणबी नोंद आढळली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर अंतरवाली गावातही एकही कुणबी नोंद आढळली नसल्याची बाब उघडकीस आली आहे.
राज्य सरकारच्याशिंदे समितीने आतापर्यंत ज्या कुणबी नोंदी शोधल्या त्यातून ही माहिती समोर आली आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात मुंबई येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी आंदोलन करत असल्याचे मनोज जरांगे पाटीलयांनी आजच जाहीर केले होते.
शिंदे समितीलाअंबड तालुक्यातील १२ गावांमध्ये केवळ १२७ कुणबी नोंदी सापडल्या आहेत. तसेच अंतरवाली सराटी येथे एकही कुणबी नोंद सापडलेली नाही.
मराठा आरक्षणाचे संघर्षकर्ते मनोज जरांगे यांच्या कुटुंबात एकही कुणबी नोंद आढळली नाही तसेच ज्या गावातूनमराठा आरक्षणाची लढाई सुरू झाली व राज्य सरकारला धावाधाव करावी लागली. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातच एकही कुणबी नोंद शिंदे समितीला आढळली नाही, अशी माहिती समोर आली आहे. न्या. शिंदे समितीनं राज्यभरातून हजारो कुणबी नोंदी शोधून काढल्या. त्यासाठी हैदराबादचाही दौरा केला. मात्र जरांगेंच्या गावातच समितीला एकही नोंद आढळली नाही. त्यामुळं मनोज जरांगे, त्यांचे कुटुंबीय आणि अंतरवाली सराटीचे गावकरी कुणबी आरक्षणापासून वंचित राहण्याची चिन्हं आहेत.
यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, कुणबी नोंदी सापडल्या नाहीत की त्या जाणूनबुजून मिळवल्या नाहीत, हा प्रश्न आहे. पण आम्ही मागे हटणार नाही. आई ओबीसी किंवा कुणबी असल्यास मुलालाही संबंधित जातीत प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी जरांगे यांनी केली आहे.