मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde : शपथ पूर्ण करण्याचं काम मी करतोय; एकनाथ शिंदे मराठा मोर्चापुढं काय बोलले?

Eknath Shinde : शपथ पूर्ण करण्याचं काम मी करतोय; एकनाथ शिंदे मराठा मोर्चापुढं काय बोलले?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 27, 2024 11:27 AM IST

Eknath Shinde on Maratha Reservation : आरक्षणाच्या संदर्भातील अध्यादेश काढल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मराठा मोर्चासमोर आपलं मनोगत व्यक्त केलं.

Eknath Shinde
Eknath Shinde

Eknath Shinde on Maratha Reservation : ‘मी स्वत: एका सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळं मराठा समाजाची दु:खं आणि वेदना मला चांगल्या माहीत आहेत. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आरक्षणाचा शब्द दिला होता. तो मी पूर्ण करत आहे,’ असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केलं. दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती आहे, असंही त्यांनी सांगितलं.

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मराठा समाजाच्या आरक्षण मोर्चाची आज सांगता झाली. मराठा समाजाच्या मागण्या सरकारनं मान्य केल्यानंतर पाटील यांनी मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वत: नवी मुंबईत जाऊन जरांगे यांचं उपोषण सोडवलं. त्यावेळी त्यांनी आंदोलकांना संबोधित केलं. 

Manoj Jarange Patil : गुलालाचा अपमान होऊ देऊ नका, मनोज जरांगे यांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

'देशाचंच नव्हे, तर जगाचं लक्ष सकल मराठा समाजाच्या आंदोलनाकडं लागलं होतं. आपली एकजूट आपण कायम ठेवली. अतिशय संयमीपणे, शिस्तीनं हे आंदोलन केलं. आंदोलन करताना इतर समाजाला त्रास होऊ दिला नाही, याबद्दल मुख्यमंत्र्यांनी जरांगे यांच्यासह सर्व आंदोलकांचे आभार मानले.

'मराठा समाजानं अनेकांना मोठं केलं. मोठी-मोठी पदं मिळवून दिली. मात्र, पदं मिळाली तेव्हा समाजाला न्याय देण्याची संधी त्यांनी घालवली. आपलं सरकार हे तुमचं सरकार आहे. मतासाठी नाही, हितासाठी निर्णय घेतले आहेत. सर्वसामान्यांना न्याय देणारे निर्णय सरकारनं घेतले आहेत. हा ऐतिहासिक दिवस आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी केलं जरांगेंच्या नेतृत्वाचं कौतुक

'मी आपल्या प्रेमापोटी या ठिकाणी आलो. आपलं सरकार देणारं आहे, घेणारं नाही. एक सर्वसामान्य माणूस ज्याला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. त्याच्या मागे लोक उभे राहिले. असं ज्यावेळी होतं, त्यावेळी त्यात एक वेगळेपण असतं, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं.

Manoj Jarange Patil : सरकारनं काय-काय मान्य केलं? मनोज जरांगे यांनी स्वत: महाराष्ट्राला सांगितलं!

आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसींचे सर्व अधिकार

'आज धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती आहे. बाळासाहेबांची जयंती नुकतीच झाली. या दोघांचे आशीर्वाद आणि सकल मराठा समाजाच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेत, असं शिंदे म्हणाले. आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसींच्या सवलती व अधिकार दिले जातील. आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना आर्थिक मदत दिली आहेच, पण नोकऱ्याही दिल्या जाणार आहेत. सरकार पूर्ण गंभीर आहे. मंत्रिमंडळाशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे, असंही शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

WhatsApp channel