Maratha Reservation: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणावरून केलेल्या वक्तव्यावर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. राज ठाकरेंना आरक्षणाची गरज नाही. पण बाकीच्यांना आरक्षण हवे आहे. एसीत बसणाऱ्यांना आरक्षणाची झळ कळणार नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.
'आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे, ही भूमिका मनसेच्या स्थापनेपासूनच आहे. महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, कारण राज्यात संधी उपलब्ध आहेत. पण त्या संधी बाहेरच्या मुलांना मिळतात, स्थानिकांना मिळत नाहीत. या संधीचा योग्य वापर झाला तर आरक्षणाची गरजच नाही. आंबेडकर, फुले, शाहू आर्थिक गरजूंना आरक्षण द्यावं या मताचे होते', राज ठाकरे म्हणाले. यावर जरांगे पाटील म्हणाले की, ‘राज ठाकरेंना आरक्षणाची गरज नाही. पण बाकीच्यांना हवे आहे. गोरगरिबांना आरक्षणाची आवश्यकता आहे, याचा राज ठाकरे यांनी विचार करायला पाहिजे. त्यांना जे वैभव मिळाले आहे, ते मराठ्यांच्या जीवावर मिळाले. एसीत बसणाऱ्यांना आरक्षणाची झळ कळणार नाही.’
राज ठाकरे यांच्या ताफ्यावर झालेल्या सुपारी हल्लाबाबत बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, 'राज ठाकरेंच्या गाडीवर सुपारी फेकणारे मी बघितले नाही. पण राज्यात आंदोलन सुरू नाहीत. फडणवीसांनी सुपारी घेतलासारखे आंदोलन करणे, रॅली काढणे बंद करा. मराठा समाजात ताकद आहे', असेही जरांगे पाटील म्हणाले.
राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या भूमिकेनंतर बीडमध्ये त्यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकण्यात आल्या. यानंतर काहीच तासांत ठाण्यातील सभेसाठी जात असताना उद्धव ठाकरेंचा ताफ्यावर मनसैनिकांनी नारळ, बांगड्या आणि शेण फेकले. या घटनेच्या काही तासांमध्ये कोल्हापुरात शिवसैनिकांनी मनसे शाखा फलकांना काळे फासत तोडफोड केल्याची माहिती समोर आली. या घटनेवर ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या असून उद्धव ठाकरे यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. ते काय बोलतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
बीड घटनेवर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, 'शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे स्वत:च्या राजकारणासाठी मराठा समाजाच्या आडून भांडण लावत आहेत. मराठा समाजाला माझ्याविरोधात भडकवण्याचे प्रयत्न सुरू आहे. या लोकांनी राजकारणाचा चिखल करून ठेवला आहे. पण त्यांनी माझ्या नादी लागू नये, नाहीतर एकही सभा घेता येणार नाही', असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.