Maratha Reservation: विधानसभेच्या अधिवेशनात मराठा नेते जरांगे पाटील यांच्या वक्तव्यावरून वाद पेटला. मराठा आंदोलनावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गोंधळ पाहायला मिळाला. यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी मार्फत चौकशी करा, असे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.
जरांगेच्या वक्तव्यावरून सभागृहात वाद निर्माण झाला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जरांगेंच्या आंदोलनाची चौकशी करण्यासाठी एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. हिंसा अथवा हिसंक वक्तव्य याला लोकशाहीत स्थान नाही. यासाठी योग्य उपाय योजना करण्याची जबाबदारी शासनाची आहे. याच गांभीर्य लक्षात घेत शासनाने याची सखोल एसआयटी चौकशी करावी, असे नार्वेकर यांनी म्हटले.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सलाईमधून विष देऊन मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. मराठा समाजच्या संदर्भात मी काय केले? हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला दिलेले आरक्षण उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात टिकवले. सारथीला निधी शिष्यवृत्ती आणि कर्ज दिले. यामुळे मला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही. जरांगे पाटलांच्या आरोपानंतर मराठा समाज माझ्या पाठीशी उभा राहिला. त्यांच्यापाठीशी नाही, असे फडणवीस म्हणाले.
राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरु झाल्यानंतर विधानसभेत भाजप नेते आशिष शेलार यांनी मनोज जरांगे यांच्या वक्तव्याबाबत भूमिका मांडली. आशिष शेलार म्हणाले की, आपण मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले. मात्र, मनोज जरांगे पाटील यांनी काल महाराष्ट्र बेचिराख होईल, अशी भाषा वापरली. निपटून टाकू आणि बेचिराख असे जरांगे म्हणतात. ही योजना कोणी आखली आणि यामागे कोण आहे? या सर्व प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.
“मी मराठ्यांचे काम करतोय. ते सत्तेचा वापर करतील. देवेंद्र फडणवीस हे आशिष शेलार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवणार आहेत. ज्या तरुंगात घेऊन जायचे आहे, तिथे चला. चौकशी लावा. मला सगळ्यात जास्त फोन तुमचेच आले. मी सलाईन उचलून चौकशीला येतो", असे जरांगे म्हणाले.
संबंधित बातम्या