Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आज सहाव्या दिवशी उपोषण स्थगित केले आहे. मात्र, जरांगे पाटील यांनी सरकारला १ महिन्याची मुदत दिली. येत्या १३ जुलैपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास निवडणुकीच्या रिंगणात उतरू, असाही त्यांनी इशारा दिला. जरांगे पाटील हे सगेसोयऱ्यांच्या मागणीवर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस होता. राज्य सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई, राणा जगजितसिंह आणि खासदार संदिपान भुमरे यांनी आज अंतरावाली सराटी येथे पोहोचत मनोज जरांगे यांची भेट घेतली. शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित केले. जरांगे पाटील हे सगेसोयऱ्यांच्या मागणीवर ठाम असून त्यांनी मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला एक महिन्याचा म्हणजेच १३ जुलैपर्यंत वेळ दिला. महिन्याभरात मागण्या मान्य झाल्या नाहीतर राजकारणात उतरणार, असाही त्यांनी सरकारला इशारा दिला.
शंभूराज देसाई यांच्याशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, मला राजकारणात जायचे नाही. मराठा समाजाला राजकारणांत पाडायचे नाही. मराठ्यांच्या गोरगरीब मुलांसाठी हा लढा उभा केलेला आहे.पण लोकांचा शब्द डावलून एका महिन्याच्या आत मागण्या मान्य न झाल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत उतरणार. २८८ मतदानसंघात नाव घेऊन उमेदवार पाडू. शंभूराज देसाई यांच्यामुळे मी सरकारला एक महिन्याची वेळ दिला. एका महिन्यात मागण्या मान्य न झाल्यास सत्तेत जाऊन आरक्षण घेऊ, असेही जरांगे पाटील म्हणाले.
सगेसोयऱ्यांची अंमलबजावणीसाठी सरकार दिरंगाई करत आहे, असा गैरसमज मनोज जरांगेंनी यांनी करू घेऊ नये, त्यांनी हा विचार डोक्यातून काढून टाकावा, असे यावेळी शंभूराज देसाई यांनी सांगितले. राज्यसरकार मराठा आरक्षणाबाबत शब्दाचे पालन करेल. सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीला आमचा विरोध नाही. पण घाई नको. राज्याचे उपमुख्यमंत्री उद्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेणार आहेत. तुमचाही प्रतिनिधी पाठवा. आम्हाला दोन महिन्याच्या कालावधी द्या, थोडं सहकार्य करा, असे शंभूराजे देसाई म्हणाले.
संबंधित बातम्या