Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली; उपचारासाठी डॉक्टरांची धावाधाव!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली; उपचारासाठी डॉक्टरांची धावाधाव!

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली; उपचारासाठी डॉक्टरांची धावाधाव!

Jun 12, 2024 08:08 AM IST

Manoj Jarange Patil Health Updates: मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर येत आहे.

मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे.
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. (ANI)

Manoj Jarange Patil Hunger Strike: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना पहाटे अडीच वाजता तीन सलाईन लावण्यात आल्या. मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारपासून (८ जून २०२४) पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू केले. मराठा समाजातील सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्रे देण्याच्या अधिसूचनेचा मसुदा जारी करण्यात आला होता त्याची अंमलबजावणी करावी, अशी त्यांची मागणी आहे. आपल्या मागण्या मान्य न झाल्यास विधानसभेच्या निवडणुकीत २८८ मतदारसंघांत उमेदवार उभे करण्याचा इशाराही दिला.

जरांगे पाटलांनी शनिवारी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. मंगळवारी सकाळपासून त्यांची प्रकृती खालावली. यानंतर डॉक्टरांच्या पथकाने त्यांना उपचार घेण्याची विनंती केली. मात्र, जरांगे पाटलांनी स्पष्ट नकार दिला. परंतु, बुधवारी पहाटे त्यांची प्रकृती आणखी खालावल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना उपचारासाठी आग्रह केला. तसेच त्यांची समजूत काढली. यानंतर जरांगे पाटलांनी उपचारासाठी होकार दिला. त्यांना आज पहाटे अडीच वाजताच्या सुमारास तीन सलाईन लावण्यात आल्या. 

रक्तदाब कमी झाल्यानंतरही उपचारासाठी नकार

दरम्यान, डॉक्टरांच्या पथकाने मंगळवारी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची तपासणी केली. त्यावेळी जरांगे पाटलांचा रक्तदाब कमी झाल्याचे समजले. त्यांच्या रक्तातील साखरेची पातळीही खालावल्याने त्यांना उपचाराची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, असे असतानाही जरांगे पाटील यांनी मंगळवारी उपचार घेण्यास नकार दिला. अद्याप राज्य सरकारकडून कोणालाही मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करायला पाठवण्यात आलेले नाही. सरकार आता कोणते पाऊल टाकणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

राज्य सरकारकडून आंदोलन थोपविण्याचा प्रयत्न

जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी परवानगी दिलेली नसताना मनोज जरांगे पाटलांनी जालन्यातील आंतरवाली सराटी या गावात बेमुदत उपोषण सुरू केले. मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत आपण आंदोलन सुरूच ठेवणार, असाही त्यांनी इशारा दिला. आंतरवाली सराटीमधील नागरिकांना भडकावून राज्य सरकार आंदोलन थोपविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा देखील त्यांनी आरोप केला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर