Manoj Jarange Patil Hunger Strike Updates: मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर १७ दिवसानंतर उपोषण मागे घेतले आहे. तसेच उपचार घेण्याची तयारी दाखवली आहे. याशिवाय, त्यांनी उद्यापासून धरणे आणि साखळी उपोषण करण्याचे मराठा बांधवांना आवाहन केले आहे. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर ते पुन्हा महाराष्ट्र दौरा करणार आहेत.
अंबडमध्ये रात्री १ वाजता संचारबंदी लागू करण्यात आली. यामुळे लोकांच्या संचारावर निर्बंध आले. यानंतर आज सकाळी छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड येथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. अंबडमध्ये संचारबंदी असल्याने नागरिकांना भेटता येत नाही. यासाठी मनोज जरांगे स्वत: लोकांच्या भेटी घेणार आहेत. यासाठी मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले. अंतरवली सराटी गावातील महिलांच्या हातातून पाणी पिऊन उपोषण मागे घेणार असल्याचे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले. तसेच लवकरच आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाईल, असेही ते म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांनी १० फेब्रुवारी २०२४ रोजी उपोषणाला सुरुवात केली. आज त्यांच्या उपोषणाचा १७ वा दिवस आहे. सरकारने काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, यासाठी ते पुन्हा एकदा उपोषणाला बसले. अखेर आज त्यांनी अचानक उपोषण मागे घेतले असून येत्या काळात आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार स्पष्ट केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सलाईमधून विष देऊन मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आला.तसेच मी सागर बंगल्यावर येतो, मला मारून दाखवावे असे म्हणत जरांगे पाटील मुंबईकडे निघाले होते. जरांगे पाटील यांच्या आरोपानंतर मराठा आंदोलकांनी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात एसटी मंडळाची बस पेटवून दिली. ज्यामुळे जालनासह आजूबाजुच्या भागात संचारबंदी लागू करण्यात आली.