Manoj Jarange Patil firm on Azad Maidan Protest : पोलिसांची परवानगी मिळो किंवा न मिळो, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठरल्याप्रमाणे आझाद मैदानातच उपोषणाला बसणार, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी बोलून दाखवला आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी तयारी देखील सुरू केली आहे. स्टेज बांधून झाला आहे, असंही जरांगे यांनी स्पष्ट केलं.
मराठा समाजाला शिक्षण व नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावं या मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील यांनी एल्गार पुकारला आहे. यापूर्वी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी इथं उपोषण करून त्यांनी आपल्या आंदोलनाची चुणूक दाखवून दिली होती. राज्य सरकारनं आरक्षणाचं आश्वासन देऊन जरांगे यांचं उपोषण सोडवण्यात यश मिळवलं होतं. मात्र, त्यानंतर सरकारनं आश्वासन पाळलं नसल्याचा जरांगे यांचा दावा आहे. त्यामुळं जरांगे यांच्यासह हजारो मराठे मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत.
मनोज जरांगे हे हजारो मराठ्यांसह मुंबईत बेमुदत आंदोलन करणार आहेत. त्या विरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात धाव घेतली होती व जरांगे यांना मुंबईत येण्यापासून रोखण्याची विनंती केली होती. न्यायालयानं याचिकाकर्त्याचा व सरकारचं मत जाणून घेतल्यावर जरांगे यांच्या प्रकरणात योग्य ती पावलं उचलण्याचे निर्देश पोलिसांना व सरकारला दिले होते. त्यानंतर आझान मैदानाची क्षमता पाहून जरांगे यांनी मुंबईच्या बाहेरच आंदोलन करावं, अशी नोटीस पोलिसांनी बजावली व आझाद मैदानात आंदोलनास परवानगी नाकारली. मात्र, जरांगे हे आंदोलनावर ठाम आहेत.
'आम्ही राज्य सरकारला सहकार्य करण्यास तयार आहोत. मात्र, त्यांनी चर्चेला यायला हवं. आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही. मालकांनीच यावर तोडगा काढावा, असं सांगून त्यांनी चेंडू सरकारच्या कोर्टात ढकलला.
पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी आझाद मैदानात आंदोलनाची जोरदार तयारी सुरू आहे. तिथं स्टेज बांधण्यास सुरुवात झाली आहे. प्रजासत्ताक दिनी याच ठिकाणी ध्वजवंदन केलं जाईल, अशी माहिती आंदोलकांच्या प्रतिनिधींनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना दिली.
संबंधित बातम्या
