Manoj Jarange Patil on Maratha Aarakshan : मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारनं मंजूर केलेल्या विधेयकाला विरोध करत आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला आहे.
मराठा आणि कुणबी हे एकच आहेत. त्यामुळं ज्या मराठा कुटुंबांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना व त्यांच्या सग्यासोयऱ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावं अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. मात्र, ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्यास ओबीसी जातसमूहाचा विरोध आहे. त्यावर तोडगा म्हणून राज्य सरकारनं मराठा समाजाला १० टक्के स्वतंत्र आरक्षण दिलं आहे. अर्थात, हे आरक्षण टिकणार की नाही याबाबत साशंकता आहे. याआधी दोनदा अशाच पद्धतीनं दिलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवलं आहे. त्यामुळंच ओबीसी कोट्यातूनच आरक्षण दिलं जावं अशी जरांगे यांची मागणी आहे.
याच मागणीसाठी त्यांनी येत्या २४ तारखेपासून आंदोलनाची हाक दिली आहे. येत्या २४ तारखेपासून गाव पातळीवर रोजच्या रोज उपोषण आणि रास्ता रोको करण्यात येणार आहे. सध्याचा परीक्षांचे दिवस असल्यानं सकाळी १०.३० वाजेपासून दुपारी १ वाजेपर्यंत रास्ता रोको सुरू करावा, अशा सूचना जरांगे यांनी दिल्या आहेत. ज्यांना ही वेळ जमणार नाही त्यांनी सायंकाळी ४ वाजल्यापासून रात्री ७ वाजेपर्यंत आंदोलन करावं, अशाही सूचना त्यांनी दिल्या आहेत.
गावपातळीवर आंदोलन करतानाच येत्या २९ फेब्रुवारीला जिल्हा पातळीवर सर्वांनी मिळून रास्ता रोको करावा. येत्या २९ तारखेपर्यंत सगेसोयऱ्यांची मागणी मान्य झाली नाही तर वृद्धांनीही उपोषणाला बसावं, असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं आहे. आंदोलना दरम्यान वृद्धांचा मृत्यू झाला तर सरकार जबाबदार राहणार आहे. आपल्या राज्यात २५ ते ३० लाख म्हतारे असतील. माझ्या आई-बाबांसह सर्व म्हातारे उपोषण करतील, असं त्यांनी सांगितलं.
मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही आणि त्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नका, असं आवाहन मनोज जरांगे यांनी निवडणूक आयोगाला केलं आहे. ‘निवडणूक घेतली तर प्रचाराच्या गाड्या आपल्या गोठ्यावर नेऊन सोडा. गाड्या फोड्याच्या नाहीत,’ असंही त्यांनी आंदोलकांना बजावलं.
ही सगळी आंदोलनं शांततेत करावीत. तोडफोड, जाळपोळ होता कामा नये. मराठ्याचं हे शेवटचं आंदोलन असेल. संपूर्ण देश हे आंदोलन बघेल आणि आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.
'राजकीय नेत्यांच्या दारात जाऊ नका. त्यांना तुमच्या दारात उभं करू नका. आता आमदार, खासदारांना किंमत देऊ नका. हे लोक तुमच्यामुळे मोठे झाले आहेत. ते आता दादागिरी करताहेत. कुणी नेत्यानं त्रास दिला तर त्याला जशास तसं उत्तर द्यायचं. तुम्ही आमच्या मुलाला त्रास दिला तर तुमच्या मुलाला आणि पुतण्याला त्रास होईल, असा इशाराही जरांगे पाटलांनी दिला.