Manoj Jarange Vs Fadnavis : मराठा आरक्षण (Maratha reservation) आंदोलनादरम्यान आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) यांनी देवेंद्र फडणवीसांवर (Devendra fadnavis) टोकाची टीका केली होती. मराठा आरक्षणास त्यांचा विरोध असल्याची टीका केली होती. आता पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी फडणवीसांवर टीकास्त्र सोडले आहे. नांदेडमध्ये अशोक चव्हाणांबोबत जे काही घडले हे मी पाहिले नाही. मात्र हे मराठ्यांविरोधातील फडणवीसांनी रचलेले षड्यंत्र आहे. मराठा आरक्षणाविषयी घोषणा दिल्याप्रकरणी मराठ्यांच्या गोरगरिबांच्या मुलांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. हा सूड उगवण्याचा प्रकार आहे, अशा हल्लाबोल जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर केला आहे.
जरांगे पाटील म्हणाले की, फडणवीस अशोक चव्हाणांच्या (Ashok Chavan) माध्यमातून सूडाचे राजकारण करत आहेत. फडणवीसांचा खेळ भरत आला आहे. मला जून थोडी माहिती मिळू दे, फडणवीस व मुख्यमंत्री शिंदे (eknath Shinde) यांच्याबाबत सर्व जाहिरपणे सांगतो. मी जे सांगणार आहे, ते खूपच धक्कादायक आहे. ते ऐकून सर्वांना धक्का बसेल.
याची एक झलक मी तुम्हाला सांगतो फडणवीसांनी मराठ्यांच्या विरोधात दुसरी चाल खेळली आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही त्यांना पाठिंबा आहे. तो माणूस एकनाथ शिंदे यांचा आहे. सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही. गोरगरीब मराठ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात डांबून त्यांच्यावर केवळ अन्याय करायचा आहे. गृहमंत्रीपदाचा गैरवापर करून या सर्व गोष्टी केल्या जात आहेत. तुमच्या कार्यकर्त्यांनी जर आरक्षणाबाबत घोषणा दिल्या, तर त्यांच्यावरही ३५३ कलम लावणार का?, असा सवालही मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
सरकारकडून कितीही चाल रचल्या गेल्या तरी आता मराठे जशास तसे उत्तर देणार आहोत. यानंतर जे घडेल, त्याला गृहमंत्री जबाबदार असतील, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. जरांगे पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी मराठा समाजामार्फत एकही उमेदवार आम्ही दिलेला नाही. तसेच माझा कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा उमेदवाराला पाठिंबा नाही. कोणीही स्वार्थासाठी मराठा आरक्षणाचा आणि आंदोलनाचा फायदा करून घेऊ नये, असं आवाहनही मनोज जरांगे यांनी केले आहे.
लोकसभेसाठी राज्यातील प्रत्येक मतदारसंघात मराठा समाजाचा उमेदवार देण्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली होती. मतदारसंघाचा आढावा घेऊन नाव सुचवण्याचे आवाहन त्यांनी मराठा समाज बांधवाना केले होते. मात्र, मराठा समाजासोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी भूमिका बदलली व ‘सगेसोयरे’ला विरोध करणाऱ्या उमेदवारांना पाडा, असे आवाहन त्यांनी केले होते. त्याच, पार्श्वभूमीवर मराठा समाज गावागावात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. नुकतेच काँग्रेसमधून भाजपवासी झालेले खासदार अशोक चव्हाण यांना मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावात भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी गेलेल्या खासदार अशोक चव्हाण यांच्या गाडीला मराठा समाज बांधवांनी घेराव घातला. तसेच, एक मराठा-लाख मराठा अशी घोषणाबाजी करत अशोक चव्हाण यांना गावातून परत जाण्यासाठी भाग पाडले. पोलिस संरक्षणात अशोक चव्हाणांची गाडी मराठा कार्यकर्त्यांच्या गराड्यातून बाहेर काढण्यात आली.