Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात मराठा आरक्षणाबाबत राजपत्र जारी करण्यात आले असून याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. २६ फेब्रुवारीपासून राज्यात मराठ्यांना १० टक्के आरक्षण लागू झाल्याच्या शासन निर्णयासह राजपत्र (Gazette) जारी करण्यात आलं आहे.
२० फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून मराठ्यांना शिक्षणात व नोकरीत १० टक्के आरक्षण देण्याचं विधेयक मांडले होते. मराठा आरक्षण दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर केलं होतं. त्यानंतर राज्यपालांच्या स्वाक्षरीने याचे कायद्यात रुपांतर झाले आहे. SEBC या गटामध्ये मराठा आरक्षण देण्यात आलं आहे. या कायद्यानुसार मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण लागू करण्यात आलं आहे. हे आरक्षण राज्यातील सर्व सरकारी नोकऱ्या तसेच शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रियेसाठी लागू असेल.
सध्या राज्यात आधीपासूनच सुरु असलेल्या शासकीय नोकरभरतीसाठी हे आरक्षण लागू नसेल. परंतु, २६ फेब्रुवारी आणि त्यानंतर सुरु होणाऱ्या नोकऱ्यांमध्ये मराठा समाजासाठी १० टक्के जागा आरक्षित असतील.
मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केल्यानंतर सरकारने जरांगे पाटील यांच्याविरोधात कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. मनोज जरांगे यांच्यासह मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्याचबरोबर मनोज जरांगे यांच्या वक्तव्याची व आंदोलनाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले. तसेच अंतरावली सराटीतील मंडपही हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता भाजप नेते व सरकारमधील मंत्रीही जरांगेविरोधात उघड-उघड भूमिका घेत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने १० टक्के आरक्षणाचा आदेश लागू केल्याने मराठा समाज काय भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लावले आहे.
संबंधित बातम्या