२३ ते ३१ जानेवारी दरम्यान राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. यात बौद्ध समाजाचा कॉलम नसणे, ब्राम्हणांच्या अनेक पोटजाती असणे तसेच सर्वेक्षण करताना अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यातच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मराठा आरक्षणाबाबत जो सर्व्हे सुरु आहे त्याबाबत काहीही माहिती नसणाऱ्या कर्मचाऱ्याला सर्व्हेक्षणासाठी नेमण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या तएक माणूस सांगतो की, त्याला सर्व्हेबाबत काहीच माहिती नाही, त्याचे शिक्षणही पहिलीपर्यंतच झाले असून विशेष म्हणजे सर्व्हेक्षण मोबाईलमध्ये सुरू असताना त्याला मोबाईलही वापरता येत नाही. हा व्हिडिओजितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट करत सरकार मराठा बांधवांच्या भावनांशी खेळ करतं आहे, असा आरोप केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर एक व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, हे सरकार मराठा आरक्षणासंदर्भात खरच गंभीर आहे का..? कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण नाही, सगळा फॉर्म डिजिटल असताना त्याला मोबाईल वापरता येत नाही,सर्व्हे नेमका कशासाठी चाललं आहे, याचच त्याला ज्ञान नाही, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, तो या कामासाठी पुरेसा शिक्षित नाही. एकीकडे लक्षावधी मराठा बांधव त्यांच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेले असताना, ते मुंबईकडे कूच करत असताना देखील हे सरकार सर्व्हेचा असा फार्स निर्माण करत असेल तर मराठा आरक्षण संदर्भात ते किती गंभीर आहेत, हे लोकांच्या आता लक्षात येत आहे.
आरक्षण देणार ते कसे देणार..? ओबीसी मधून देणार की इतर कोणत्या कोट्यातून देणार.? इतर कोट्यातून दिले तर ते कोणत्या प्रकारे देणार..? या मूळ प्रश्नांवर हे सरकार काहीच बोलत नाही. उलट असे सर्व्हेचे नाटक करून लाखो मराठा बांधवांच्या भावनांशी हे सरकार क्रूर पद्धतीने खेळत आहे आणि हा प्रकार आपल्या या राज्याचा हिताचा नाही, हे मी निक्षून सांगू इच्छितो. असे आव्हाड यांनी म्हटले आहे.