Maratha Reservation: मुख्यमंत्री शिंदेंनी जरांगे पाटलांना दिली ऑफर; यावर जरांगे पाटलांचं उत्तर आलं
Maratha Reservation- जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं अशी विनंती या सर्वपक्षीय बैठकीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. परंतु अशा कोणत्याही सरकारी समितीचं सदस्यत्व स्वीकारण्यास मनोज जरांगे पाटील यांनी थेट नकार दिला आहे.
मराठा समाजाला ओबीसीचे आरक्षण (OBC Reservation) देण्याच्या मागणीसाठी गेले १४ दिवस उपोषण करत असलेले मनोज जरांगे - पाटील यांच्या आंदोलनामुळे सरकारपुढे निर्माण झालेला पेच अद्याप कायम आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं अशी विनंती या सर्वपक्षीय बैठकीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. शिवाय मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या न्यायमूर्ती शिंदे समितीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात येईल, असंही या बैठकीत ठरले आहे. परंतु अशा कोणत्याही सरकारी समितीचं सदस्यत्व स्वीकारण्यास मनोज जरांगे पाटील यांनी थेट नकार दिला आहे. उद्या, मंगळवारी आपण सहकाऱ्यांशी चर्चा करून उपोषण मागे घेण्याच्या सर्वपक्षीय नेत्यांच्या विनंतीबाबत निर्णय घेऊ, असं मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी रात्री उशिरा प्रसारमाध्यमांना सांगितलं.
ट्रेंडिंग न्यूज
मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले
मनोज जरांगे पाटील हे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवली सराटी या गावी मराठा आरक्षणासाठी उपोषणावर बसले आहेत. परंतु १ सप्टेंबर रोजी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला होता. त्यानंतर अनेक आंदोलक जखमी झाले होते. यातील काही आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. हे सर्व गुन्हे तत्काळ मागे घेण्याची कार्यवाही सुरु झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई
मराठी आरक्षणासाठी उपोषणाच्या वेळी परिस्थिती योग्य पद्धतीने न हाताळल्याबद्दल संबधित उपविभागीय अधिकारी आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्यावर कार्यवाही करण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, छगन भुजबळ, गिरीश महाजन, दादा भुसे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, माजी खासदार संभाजीराजे भोसले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात, शिवसेना आमदार अनिल परब, माजी मंत्री, आमदार राजेश टोपे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
संबंधित बातम्या