मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maratha Reservation : ‘सगेसोयरे’च्या मागणीवर काय म्हणाले एकनाथ शिंदे? जरांगेंना काय केलं आवाहन?

Maratha Reservation : ‘सगेसोयरे’च्या मागणीवर काय म्हणाले एकनाथ शिंदे? जरांगेंना काय केलं आवाहन?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 20, 2024 06:35 PM IST

Eknath Shinde on Maratha Reservation : मुख्यमंत्री म्हणाले की, सगेसोयरे अध्यादेशाबाबत ६ लाख हरकती आल्या आहेत. त्यामुळे घाईगडबडीत निर्णय घेणे चुकीचे आहे. हरकतींची छाननी सुरू आहे.

CM Eknath Shinde on Maratha Reservation
CM Eknath Shinde on Maratha Reservation

विधीमंडळात आज मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. मराठा समाजाला शिक्षण व नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण देण्याचे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले असून विधानपरिषदेत सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर याचे कायद्यात रुंपातर होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बोलावलेल्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक मांडले व सर्वसंमतीने हे मंजूर करण्यात आले. 

मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये १० टक्के आरक्षण देण्याचे विधेयक विधानसभेत मंजूर झाले असले तरी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका जाहीर केली आहे. त्यांनी सगेसोयरे शब्दावरुन सरकारला इशारा दिला आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत भूमिका मांडली. सगेसोयरे अध्यादेशावर लवकरच कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदेंनी दिले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, सगेसोयरे अध्यादेशाबाबत ६ लाख हरकती आल्या आहेत. त्यामुळे घाईगडबडीत निर्णय घेणे चुकीचे आहे. हरकतींची छाननी सुरू आहे. त्यामुळे, त्यासाठी देखील कर्मचारी व अधिकाऱ्यांना जबाबदारी दिली आहे. अर्जाची छाननी केल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल हरकती अर्जांवर सविस्तरपणे छाननी करून कार्यवाही केली जाईल, असे शिंदेंनी विधानसभेत स्पष्ट केले. तसेच, सन १९६७ च्या जुन्या कुणबी नोंदी होत्या, त्यांना दाखले, प्रमाणपत्र देण्याचं कामही सरकारने सुरू केलेलं असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले की, लाखो मराठा बांधवांसाठी इच्छापूर्तीचा आजचा ऐतिहासिक दिवस आहे. आजचा हा दिवस माझ्यासाठी आनंदाचा, समाधानाचा आणि कर्तव्याची जाणीव करून देणारा दिवस आहे. ओबीसी बांधव असो, किंवा इतर कोणताही समाज असो.. आम्ही कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजासाठी शैक्षणिक आणि नोकरीतले आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. 

मुख्यमंत्री म्हणाले की, जरांगे पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना विनंती आहे की, मी मराठ्यांना आरक्षण देण्याची शपथ घेतल्यानंतर केवळ ३ महिन्यात आरक्षण दिले आहे. आरक्षण टिकण्यासाठी सरकार पूर्णपणे न्यायालयाला आपली बाजू पटवून देईल. आंदोलकांनी संयम बाळगला पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

WhatsApp channel