मराठा आरक्षणासाठी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या अनेक वर्षातील सहकारी व कीर्तनकार अजय महाराज बारस्कर यांनी जरांगे खोटं बोलत असून त्याच्या सरकारसोबत गुप्त बैठका झाल्याचा खळबळजनक दावा केला असतानाच आता जरांगे यांच्या अन्य तीन जुन्या सहकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. जरांगे यांनी आमचं आयुष्य बर्बाद केल्याचा आरोप त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे.
मनोज जरांगे यांचे एकेकाळचे सहकारी बाबुराव वाळेकर यांनी जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, मी मनोज जारंगे पाटील यांचा १८ वर्षांपासून सहकारी आहे. कोपर्डी घटनेतील आरोपींवर आपण हल्ला करायचा असं मनोज जरांगे पाटील यांनी आम्हाला सांगितले होतं. त्यामुळे आम्ही कोर्टात हल्ला केला. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी पळ काढला. मनोज जरांगे पाटील यांनी १० ते १२ जणांचे संसार उध्वस्त केले. कोपर्डी घटनेत आम्ही २ वर्ष जेलमध्ये होतो.
आंतरवाली सराटीमध्ये पहिल्यांदा उपोषण करताना राजेश टोपे यांच्या घरात बैठक घेतली. त्यानंतर पुढच्या १५ मिनिटात दगडफेक झाली. महिलांची ढाल बनवली. आम्हाला दगडफेक करायचा निरोप दिला होता. २०१९ पासून मनोज जरांगे पाटील राजकारण करत असून राष्ट्रवादीचे काम करतात. राष्ट्रवादीला पाठिंबा देतात. शरद पवार आणि राजेश टोपे यांनी त्यांना मदत केली आहे. राष्ट्रवादी व राजेश टोपे यांच्यासाठी ते काम करतात व आम्हालाही ते करायला लावतात. आजही त्यांच्यासोबत जे आहे ते राष्ट्रवादीचेच आहेत, असे गंभीर आरोप बाबुराव वाळेकर यांनी करत राजेश टोपे यांच्यासोबत व्यासपीठावर बसले असतानाचा जरांगे याचा फोटो पत्रकार परिषदेत दाखवला.