Manoj Jarange News: मराठा आरक्षणाबाबतच्या विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले मराठा नेते मनोज जरांगे यांनी आज अखेर उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली. पण ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. तसेच आमच्या मागण्या मान्य झाल्यास झाल्यास मुंबईत मोर्चा काढणार, असाही इशारा जरांगे यांनी यावेळी दिला. जरांगे यांचे वर्षभरातील हे सातवे आंदोलन आहे.
मनोज जरांगे यांच्याव्यतिरिक्त, महिलांसह १०४ कार्यकर्त्यांनी २५ जानेवारीपासून मराठा समाजाला इतर मागासवर्गीय प्रवर्गांतर्गत आरक्षण मिळावे या मागणीसाठी उपोषण सुरू केले. उपोषणदरम्यान, त्यांची प्रकृती बिघडल्याने भाजप आमदार सुरेश धस यांनी राज्य सरकारच्यावतीने अंतरवली सराटीत जरांगे यांची भेट घेतली. राज्य सरकारकडून मनोज जरांगे यांना काही आश्वासने देण्यात आली. त्या आश्वासनानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली.
मनोज जरांगे म्हणाले की, मी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. कारण, मी पुढे जाण्यासाठी वेगळी रणनीती अवलंबण्याचा निर्णय घेतला. सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा त्यांचा हेतू आहे का? हे स्पष्ट करावे. मी फडणवीस यांना बुधवारी संध्याकाळपर्यंत त्यांची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले, पण ते गप्प राहिले. या मुद्द्याला कोण खरोखर समर्थन देते आणि कोण नाही, हे उघड करण्यासाठी माझे उपोषण होते. मी मुख्यमंत्र्यांना शांत बसू देणार नाही. मराठा समाजाला आता कळले आहे की, चूक कोणाची आहे. सत्तेत आल्यानंतर फडणवीस यांनी मराठ्यांचा विश्वासघात केला आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर मौन बाळगले, पण मी त्यांना सोडणार नाही.
मनोज जरांगे यांनी बीड जिल्ह्यातील मसाजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील सहभागींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. दरम्यान, ९ डिसेंबर २०२४ रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण, छळ आणि हत्या करण्यात आली.
संबंधित बातम्या