Manoj Jarange Patil vs Dhananjay Munde: संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेर्धात परभणी येथे काल आयोजित करण्यात आलेल्या मूक मोर्चात मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना आक्षेपार्ह व्यक्तव्य केले. याप्रकरणी जरांगे पाटलांविरोधात बीड येथील परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यावर जरांगे पाटील काय प्रतिक्रिया देतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बीड येथील परळी शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरनुसार, संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी काढलेल्या निषेध मोर्चात जरांगे यांनी धनंजय मुंडेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. परळी येथील ३२ वर्षीय शेतकरी तुकाराम बाबुराव आघाव यांनी ही तक्रार दाखल केली. ‘जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना हरामखोर अवलादीचे म्हटले. याशिवाय, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या धनंजय मुंडे यांची बदनामीकारक असंवैधानिक वक्तव्य करून त्यांची बदनामी केली. तसेच त्या भाषणाचे व्हिडिओ व्हायरल केले’, तुकाराम यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले. याप्रकरणी जरांगे पाटलांविरोधात भारतीय न्याय संहिताच्या कलम ३५६(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परभणी येथे काल आयोजित करण्यात आलेल्या मूक मोर्चात जरांगे पाटलांनी धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला पुन्हा त्रास झाल्यास मंत्री धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा त्यांनी थेट इशारा दिला. मराठा समाजाने तुम्हाला साथ दिली आहे त्या मराठा समाजाच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करू नका. मराठा समाजावर बिनबुडाचे आरोप होत राहिल्यास योग्य तो बदला घेतला जाईल, असेही ते म्हणाले. सरकारने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर, मोठे मोर्चे काढून आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
नुकतेच वकील सदावर्ते यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करणाऱ्या जरांगे पाटलांना खडेबोल सुनावले. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, ‘पावशेर दारू पिऊन कोणी धनजय मुंडेना अपमानित केले तर, त्याची गय केली जाणार नाही. तुमच्या बापाचे रस्ते आहेत का? शेतीला शेत असल्यास वाट द्यावी लागते. जरांगे तुझे काय शिक्षण आहे? जरांगे असो किंवा धस. मृतांच्या टाळूवरचे लोणी खात आहेत. एखाद्या मृत व्यक्तीच्या नावाखाली राजकारण करत आहेत',असेही ते म्हणाले. याशिवाय, ‘संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने ठोस कायदा करावा, या मागणीसाठी राज्यातील ग्रामपंचायतीत ९ जानेवारीला काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे’, अशीही माहिती सदावर्ते यांनी दिली.
संबंधित बातम्या