राज्य सरकार झुकले असून मराठा समाजाला मागच्या दाराने ओबीसीमध्ये प्रवेश दिला जात आहे.त्यामुळे ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असून ओबीसी समाजावर अन्याय होत आहे. सध्या सुरू असलेल्या झुंडशाहीसमोर सरकार नमले आहे. याविरोधात आम्हाला कोर्टात जाण्याशिवाय पर्याय नाही. ज्या जरांगेंना कोटी आणि लाखातला फरक कळत नाही ते ओबीसी आरक्षणाला आव्हान देण्याचं विधान करत आहेत. हिंमत असेल तर त्यांनी मंडल आयोगाविरोधात आवाज उठवावा. त्यांच्याविरोधात कारवाई करावी,त्यांना संपवून दाखवावं असं खुलं आव्हान छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांना दिलं आहे.
भुजबळ म्हणाले की, मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, अशी आमची मागणी होती. मात्र सरकार झुंडशाहीपुढं नमलं असून मागच्या दाराने सरसकट कुणबी प्रमाणपत्राचे वाटप सुरू आहे. सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्रे दिली जात असल्यानं ओबीसी, भटक्या विमुक्त यांचं आरक्षण धोक्यात येत आहे. अशा परिस्थितीत आमच्याकडे दुसरा पर्याय उरला नाही. त्यामुळे आमदार-खासदारांसमोर आमची कैफियत मांडणे, न्यायालयाचे दरवाजे ठोठावणे, लोकांमध्ये जनजागृती करणे,आक्रोश व्यक्त करणे, असे मार्ग आमच्यासमोर उरले आहेत. लोकशाहीने जे काही अधिकार दिले आहेत ती आयुधं वापरणार आहोत, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.
यावेळी छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंना जाहीर आव्हान दिलं. तसंच भारतात त्यांच्या इतका मोठा ज्ञानी नाही असा टोलाही लगावला. मनोज जरांगे यांच्याइतका ज्ञानी भारतात दुसरं कोणी नाही. ते तीन कोटी मराठा बांधव मुंबईत आणणार होते. पण नवी मुंबईत सर्वांनीच पाहिले किती लोक होते. त्यांना लाखात, कोटीत फरक कळत नाही आणि मंडल आयोगाला आव्हान द्यायला चाललेत. त्यांनी मंडल आयोगाला संपविण्याचे काम करून दाखवावं. असं छगन भुजबळ म्हणाले.
राज्यात उन्माद झुंडशाही सुरू आहे. पहाटेतीन वाजेपर्यंत डीजे लावून धिंगाणा घातला जात आहे. मला शिव्यादिल्या जात आहेत. फोटो, बॅनर फाडतायेत. अशी भयंकर परिस्थिती सध्या राज्यात सुरू असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.