Manoj Jarange Patil on Lok Sabha Election Result 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकीत मराठा आंदोलनाचा फॅक्टर महत्वाचा ठरला आहे. भाजपच्या अनेक जागा यामुळे पडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, लोकसभा निवडणूक निकालावर मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केले आहे. पाटील म्हणाले, मराठ्यांचा डर निर्माण झाला, हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. आता राज्य सरकारने मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावे. नाही तर राज्यात २८८ विधानसभा मतदारसंघात, उमेदवार उभे करून त्यांचा कार्यक्रम करू असे जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटीत प्रसार मध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वरील वक्तव्य केले. जरांगे पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीत कोण जिंकलं कोण हरलं याच्याशी काहीही देणंघेणं नाही. आम्हाला निवडणुकीच्या विजयाच्या गुलालात रस नाही. आम्हाला आरक्षणाचा गुलालच हवा आहे. मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर याची जबर किंमत मोजावी लागेल. राजकारण हा माझा किंवा माझ्या समाजाचा मार्ग नाही, हे मी आधीच बोललो होतो.
बजरंग सोनवणे यांच्या बद्दल बोलतांना जरांगे पाटील म्हणाले, अंतरवाली सराटीत मला यापूर्वीही सगळे भेटायला येत होते. आताही अनेक जण भेटायला येतात. कोणीही मला भेटायला आल्यावर त्याला शुभेच्छा देणे, हे माझे कर्तव्य आहे.
पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे यांच्याबद्दल बोलतांना जरांगे पाटील म्हणाले, मी राजकारणात नाही. तसेच लोकसभा निवडणुकीत कोणाला पाडा, असे कुणालाही सांगितले नाही.फक्त मत देतांना मराठ्यांच्या मतांची भीती वाटली पाहिजे असे बोललो. या निवडणुकीत मराठा समाजाने त्यांची भूमिका दाखवून दिले, असे जरांगे पाटील यांनी म्हटले.
सरकारने मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावे. नाही तर विधानसभेच्या सर्व जागांवर उमेदवार उभे करेन. यात सगळ्या जातीधर्माचे उमेदवार उभे करुन सरकारचा कार्यक्रमच लावणार. मी ८ जूनपासून आमरण उपोषणाला बसणार आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस साहेबांना सांगू इच्छितो की, तुम्ही तात्काळ आरक्षणाचा निर्णय घ्या. आम्हाला आमचा हक्क देऊन टाका. आम्ही आता वाट पहाणार नाही.