सकल मराठा समाजाने पुणे मतदारसंघातून लोकसभेला उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबतच्या मागण्या मान्य केलेल्या नाहीत. आरक्षणासाठी मनोज जरांगे आंदोलन करत असून त्यांनी राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा समाजाचा उमेदवार उभा करावा, असे आवाहन केले होते. त्या पार्श्वभुमीवर मंगळवारी पुण्यात झालेल्या बैठकीमध्ये पुण्यातून मराठा समाजाचा एक उमेदवार देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. सर्व मराठा समाजाने संबंधित उमेदवाराच्या पाठिशी पुर्णपणे उभे राहावे, असे आवाहनही या बैठकीतून करण्यात आले.
मराठा समाजाच्या वतीने खंडोजी बाबा मंदिरामध्ये बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला पर्वती, वारजे, शिवाजीनगर, वडगावशेरी, धनकवडी, कोथरुड, कर्वेनगर, स्वारगेट, कात्रज, बाणेर, पाषाण या भागातील मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीमध्ये मनोग जरांगे यांनी केलेल्या सूचनांवर चर्चा करण्यात आली. मराठा समाजाच्या या बैठकीला पुण्यातुन लोकसभेसाठी इच्छुक असलेले वसंत मोरे उपस्थितीत होते. यामुळे मराठा समाजाकडून त्यांना मैदानात उतरवण्यात येणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
सकल मराठा समाजाच्या या बैठकीमध्ये मनोग जरांगे यांनी केलेल्या सुचनांवर चर्चा केली गेली. त्यानुसार मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांचे फॉर्म भरून घेतले जाणार आहेत. ३० मार्चपर्यंत पुण्यातील इच्छुकांचे अर्ज भरुन घेतले जातील ते सर्व अर्ज मनोज जरांगे यांच्याकडे पाठविण्यात येणार आहेत. मनोज जरांगे उमेदवाराची घोषणा करणार आहेत. त्याचबरोबर प्रत्येक प्रभागामध्ये बैठका घेऊन मराठा समाजाची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. १८ एप्रिल पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.