मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून आज मुंबईत जालन्यातील अंबड तालुक्यातील एका कार्यकर्त्याने आत्महत्या केल्याने राज्यभरात खळबळ माजली आहे. सुनील बाबुराव कावळे असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. आत्महत्येनंतर मराठा नेते आक्रमक झाले असून राजकीय नेत्यांना प्रवेश बंदीचा इशारा दिला आहे. सरकारकडून कावळे यांच्या कुटूंबाला आर्थिक मदत जाहीर केली आहे. सरकारच्या वतीने मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले की, सुनिल कावळे यांच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत दिली जाईल, तसेच कावळे यांच्या मुलाला त्याच्या शिक्षणानुसार सरकारी नोकरी देण्यात येईल, अशी घोषणा केसरकर यांनी केली.
त्याचबरोबर केसरकर यांनी मराठा तरूणांना आवाहन केलं की, ओबीसी समाजाला असलेल्या सर्व सुविधा मराठा समाजाला दिल्या आहेत. सरकार आरक्षण प्रकरणी संवेदशील आहे. कुणीही आत्महत्येचे पाऊल उचलू नये. स्वत:चा जीव देऊन काही मिळत नाही, असं केसरकर म्हणाले.
आपण कावळे कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत. त्यांच्या कुटुंबाची ऐकी त्यांच्या दु:खातून बाहेर येण्यास मदत करेल. आरक्षणाबाबत सरकार संवेदनशील आहे. अनेक निर्णय सरकारने घेतले आहेत. मात्र कायदेशीर बाबींच्या पूर्ततेसाठी अडचणी येत आहेत. यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सुनील कावळे यांनी मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुंबईच्या सायन रुग्णालयात नेण्यात आला. कावळे यांनी त्यांचा शर्ट आणि वहीच्या पानावर आपण आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या करत असल्याचं लिहिलंय. सुनील कावळे हे जालन्याहून एकटेच मुंबईत आले होते. मुंबईतील वांद्रे परिसरात त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने मनोज जरांगे पाटील यांना पत्र लिहिलं आहे. या घटनेची नोंद पोलीस स्थानकात झाली असून वांद्रे पोलिसांकडून तपास सुरू आहे.
संबंधित बातम्या