Manoj Jarange Patil : मुंबईच्या वेशीवर पोहोचलेला मराठा समाजाचा भव्य मोर्चा पुढंही सुरू राहणार की सरकारनं दिलेल्या आश्वासनावर समाधानी होऊन परत फिरणार याचा निर्णय पुढच्या तासाभरात घेतला जाणार आहे. मोर्चाचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील दोन वाजता भूमिका मांडणार आहेत.
आरक्षणाच्या मागणीसाठी हजारोंचा मोर्चा घेऊन मुंबईच्या दिशेनं निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठ्यांचा मोर्चा आता नवी मुंबईत आहे. मुंबईत येण्याआधीच मोर्चाच्या मागण्या मान्य व्हाव्या असा राज्य सरकारचा प्रयत्न होता. त्यानुसार कालपासून सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत होतं. या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेची माहिती जरांगे पाटील यांनी जाहीरपणे आंदोलकांना दिली.
शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावं अशी मराठा समाजाची मागणी आहे. गेल्या चार महिन्यांपासून मनोज जरांगे हे त्यासाठी आंदोलन करत आहेत. यापूर्वी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी इथं जरांगे यांनी बेमुदत उपोषणही केलं होतं. हे उपोषण सरकारच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आलं होतं. मात्र, ठरल्यानुसार आश्वासन पाळली न गेल्यानं जरांगे यांनी मुंबईत धडकण्याची घोषणा केली. त्यानुसार २० जानेवारीपासून लाखो मराठे मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत.
हा मोर्चा मुंबईत आल्यास कायदा-सुव्यवस्थेसोबतच मुंबईतील दैनंदिन व्यवस्था ठप्प होण्याची भीती आहे. त्यामुळं राज्य सरकार मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. सरकारनं आज एक जीआर काढला असून तो जरांगे पाटील यांच्याकडं पोहोचवण्यात आला आहे. त्या जीआरमध्ये नेमकं काय आहे हे जरांगे पाटील वाचून दाखवणार आहेत. त्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
संबंधित बातम्या