मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या लढ्याला यश! सरकारनं अध्यादेश काढला! नवी मुंबईतच आज मोर्चाची सांगता

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या लढ्याला यश! सरकारनं अध्यादेश काढला! नवी मुंबईतच आज मोर्चाची सांगता

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 27, 2024 10:06 AM IST

Manoj Jarange Patil On Maratha Aarakshan : मराठा समाजाच्या सर्व मागण्या सरकारनं मान्य केल्यामुळं मराठा आरक्षण मोर्चा आज माघारी फिरणार आहे.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil On Maratha Aarakshan : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला यश आलं आहे. आरक्षणाच्या संदर्भातील मराठा समाजाच्या सर्व मागण्या सरकारनं मान्य केल्या आहेत. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांच्या सग्यासोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचा अध्यादेश राज्य सरकारनं काढला आहे. त्यामुळं आज मोर्चाची सांगता होणार आहे.

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व मंत्री मंगलप्रभात लोढा हे काल रात्री अध्यादेश घेऊन मनोज जरांगे यांना भेटले. त्यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. राज्य सरकारनं काढलेल्या वटहुकुमाची प्रत तपासून पाहण्यात आली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलकांसमोर लढा यशस्वी झाल्याची घोषणा केली.

Maratha Andolan : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत रॅपिड ॲक्शन फोर्स, CISF, ITBP आणि SRPF चा तगडा बंदोबस्त

‘आपल्याला अपेक्षित असं काम राज्य सरकारनं केलं आहे. मोठं काम झालं आहे. एकनाथ शिंदे हे काम करू शकतात असं आम्ही सुरुवातीपासूनच म्हणत होतो. त्यांनी ते केलं आहे. आता मुख्यमंत्री स्वत: आल्यानंतर मी उपोषण मागे घेईन आणि आपल्या मोर्चाची सांगता करू,’ असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं.

आपला कोणत्याही पक्षाला विरोध नाही!

आपली लढाई ही समाजासाठी होती. कोणत्याही पक्षाच्या विरोधात नव्हती. मग तो विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी असो. जो पक्ष आरक्षणाला विरोध करेल, त्याला विरोध होता. आता आपल्या मागण्या मान्य झाल्या आहेत. आपल्या मुलाबाळांसाठी हा लढा होता. तो आता संपला आहे. त्यामुळं समाज म्हणून आपण कोणत्याही पक्षाला विरोध करू नये. वैयक्तिक आपापली मतं असतील त्याचा समाजाशी संंबंध नाही, असं मनोज जरांगे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

विजयाचा मुंबईत जाणार का?

राज्य सरकारनं आरक्षण दिलं तरी गुलाल उधळायला मुंबईत जाऊ असं काल मनोज जरांगे पाटील म्हणाले होते. मात्र, मुंबईत येऊ नये अशी विनंती पोलिसांनी त्यांना केली होती. त्यानुसार मुंबईत न जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. मागण्या मान्य होणं महत्त्वाचं होतं. विजयाची सभा मोठी व्हायला पाहिजे. ती योग्य ठिकाणी योग्य वेळी घेऊ, असं मनोज जरांगे यांनी यावेळी सांगितलं.

खळबळजनक! आळंदीतील एका महाराजाचा तीन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी मुंबईत येणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आपण अध्यादेशाची प्रत स्वीकारणार आहोत. सकाळी आठ वाजता ते येणार आहेत. राज्याचे प्रमुख म्हणून ते जबाबदार आहेत. समाजानं सांगितलं म्हणून मी त्यांना बोलावलं आहे. ते आल्यानंतर उपोषण सोडण्याचंही बघू, असंही मनोज जरांगे यांनी सांगितलं.

WhatsApp channel