मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ashok Chavan : काँग्रेसचे 'हे' आमदार देऊ शकतात अशोक चव्हाणांना साथ?; राजकीय वर्तुळात चर्चा

Ashok Chavan : काँग्रेसचे 'हे' आमदार देऊ शकतात अशोक चव्हाणांना साथ?; राजकीय वर्तुळात चर्चा

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 12, 2024 04:27 PM IST

Ashok Chavan : अशोक चव्हाण यांच्यानंतर काँग्रेसमधील आणखी काही आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असून तेही भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे.

Ashok Chavan
Ashok Chavan (PTI)

Congress MLA may join BJP : अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडल्याचा धक्का सौम्य ठरेल असे धक्के काँग्रेसा येत्या काळात बसण्याची शक्यता आहे. कारण, चव्हाण यांच्या पाठोपाठ पक्षातील आणखी सात ते आठ आमदार पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे. हे सर्व आमदार चव्हाण यांचे विश्वासू मानले जातात.

अशोक चव्हाण यांनी आज आमदारकीचा व काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते येत्या १५ फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्यासोबत नांदेड जिल्ह्यासह इतरही काही आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पैकी अमर राजूरकर यांनी आजच आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

चव्हाण यांच्या सोबत पक्ष सोडण्याची चर्चा असलेल्यांमध्ये जितेश अंतापूरकर, हिरामण खोसकर, सुलभा खोडक, माधव जवळकर, अमित झनक, मुंबईतील अस्लम शेख, अमीन पटेल आणि सांगलीतील एका आमदाराचं नाव आहे. हे सगळे आमदार कोणत्याही क्षणी राजीनामा देतील असं बोललं जात आहे. माजी आमदार हुनमंत बेटमोगरेकर आणि रमेश बागवे हे देखील चव्हाणांना साथ देतील, असं बोललं जातंय.

आगामी निवडणुकीत काँग्रेसला फटका बसणार

अशोक चव्हाण यांच्यासह सात ते आठ आमदार पक्षातून गेल्यास काँग्रेसला आगामी निवडणुकांमध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर महाविकास आघाडीमध्ये सध्या काँग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळं लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील जागावाटपात आपला वरचष्मा राहील असा काँग्रेसचा होरा होता. मात्र नव्या घडामोडींमुळं काँग्रेसला फारसा वाव राहणार नाही. त्याशिवाय प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानातही त्यांना उमेदवारांची चणचण भासणार आहे.

 

WhatsApp channel