Manoj Jarange : शरद पवारांनी मराठा समाजाचं वाटोळं केलं, मनोज जरांगे याचं टीकास्र; म्हणाले, आता २९ तारखेला ठरवणार!-manoj jarange slams sharad pawar over maratha reservation in nashik ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Manoj Jarange : शरद पवारांनी मराठा समाजाचं वाटोळं केलं, मनोज जरांगे याचं टीकास्र; म्हणाले, आता २९ तारखेला ठरवणार!

Manoj Jarange : शरद पवारांनी मराठा समाजाचं वाटोळं केलं, मनोज जरांगे याचं टीकास्र; म्हणाले, आता २९ तारखेला ठरवणार!

Aug 14, 2024 09:25 AM IST

Manojjarange on Sharad Pawar : जरांगे म्हणाले की, शरद पवारांनी आरक्षणाच्या प्रश्नावर काहीही न भूमिका घेता समाजाचे वाटोळे केले. परंतु हे पक्ष असे वागले म्हणून तर मराठा समाज महायुतीकडे आरक्षण मागतो आहे.

मनोज जरांगे यांची शरद पवारांवर टीका
मनोज जरांगे यांची शरद पवारांवर टीका

मनोज जरांगे पाटलांच्या (Manoj jarange) सभांचा नाशिकमध्ये समारोप झाला. समारोपाची सभा मंत्री तसेच ओबीसी नेते छगन भुजबळांच्याच नाशिकमध्ये असल्यानं जरांगेंनी पुन्हा भुजबळांवर निशाणा साधला. निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशारा जरांगेंनी पुन्हा एकदा दिला आहे. सभेनंतर पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांनी (Sharad Pawar) मराठा समाजाचे वाटोळे केल्याची घणाघाती टीकाही जरांगे यांनी केली.

 

शरद पवार यांनी सोमवारी म्हटले होते की, ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण दिल्याशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. आरक्षणाची टक्केवारी वाढवणे हाच त्याला मार्ग असून त्यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सहकार्याची भूमिका जाहीर केली आहे. पवारांच्या या विधानाचा संदर्भ देत जरांगे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. जरांगे म्हणाले, की मराठा आरक्षणाचा हा प्रश्न अगोदरच्या सरकारांनी देखील भिजत ठेवला. महाविकास आघाडीतील पक्षांनी याबाबत काहीही केले नाही.

जरांगे म्हणाले की, शरद पवारांनी आरक्षणाच्या प्रश्नावर काहीही न भूमिका घेता समाजाचे वाटोळे केले. परंतु हे पक्ष असे वागले म्हणून तर मराठा समाज महायुतीकडे आरक्षण मागतो आहे. पण तुम्हीही तसेच वागत आहात. साधे मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जात नाहीत.

११ ऑगस्ट रोजी सांगलीत झालेल्या ओबीसींच्या एल्गार सभेतून भुजबळांनी जरांगेंना २८८ जागा लढण्याचं आव्हान दिलं होतं, त्यावरून आधी नाशिकमधून अजित पवारांच्याच राष्ट्रवादीच्या जागा निवडून येतात का, ते बघ असा पलटवार जरांगे यांनी केला आहे.

पाडायचे की निवडून आणायचे २९ ऑगस्टला ठरवणार -

जरांगे म्हणाले मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण ही आपली भूमिका आहे. कोणी जरी आडवा आला तरी आम्हाला कुणी थांबवू शकत नाही. २९ ऑगस्ट रोजी पाडायचे का निवडून आणायचे ठरवणार, असं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला अंतरवलीला येण्याचं निमंत्रण दिलं आहे. जरांगेंनी मराठा समाजाला आवाहन केले की, निवडणूक आल्यावर भावनिक होवू नका. आरक्षण नसल्याने मराठा लोक व विद्यार्थी मोठे होत नाहीत, असे बोंबलू नका.

सरकार ४५ वर्षापासून फसवत आलंय. आता निवडणुकीत यांचा टांगा पलटी केल्याशिवाय रहायचं नाही. उमेदवार उभे करायचं ठरलं तर ताकदीने मतदान करा. मुलगा आणि जात डोळ्यासमोर ठेवा. गोर-गरिबांची सत्ता आली तर सर्वांना न्याय मिळेल ही भावना आहे. बारा बलूतेदार आणि मुसलमान जर एकत्र आले तर यांचा कार्यक्रम होणारच आहे. सरकारला किंवा भाजपच्या लोकांना आपल्याला आरक्षण द्यायचं नाही. सर्वपक्षीय बैठकीचा नवीन डाव टाकला जातोय. आघाडी आणि युती ही बैठक घेणार नाहीत,असा आरोपही मनोज जरांगे यांनी केला आहे.