राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात सुधारित अधिसूचना काढल्यानंतर आपले आंदोलन संपल्याचे जाहीर केलेल्या मनोज जरांगे यांनी सायंकाळी आंदोलन संपवले नसून केवळ स्थगित केल्याचं सांगितलं. आता जालन्यातून त्यांना मोठी घोषणा केली असून जोपर्यंत या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर होऊन त्या कायद्याअंतर्गत एकाला तरी मराठा आरक्षणाचा फायदा होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरु राहणार असल्याचं म्हटलं आहे.
जरांगे यांनी म्हटले की, नव्या कायद्यांतर्गत एकाला तरी लाभ मिळाला तर या आंदोलनाचं पुढं काय करायचं ते ठरवू. या आंदोलनाबाबत मराठा समाजाला गाफील राहून चालणार नाही. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यांना लाभ मिळाला पाहिजे तसेच त्यांच्या सग्या सोयऱ्यांना देखील सरकारने काढलेल्या अधिसूचनेच्या आधारे प्रमाणपत्र मिळाले पाहिजे. ते मिळेपर्यत हे आंदोलन सुरूच राहणार आहे.
आज जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या बैठकीनंतर मनोज जरांगेंनी अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर होऊन त्याची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. तसेच सोमवारी रायगडावर जाऊन शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेणार असल्याचेही जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.
शेवटच्या मराठ्याला आरक्षणाचे प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत मी इथून उठणार नसल्याचे जरांगे म्हणाले. नोंदी सापडलेल्यांसोबतच त्यांच्या सगे सोयऱ्यांनाही प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश सरकारने काढला आहे, त्याची सरकारने अंमलबजावणी करावी. नोंद मिळालेल्या सगेसोयऱ्याला ओबीसी प्रमाणपत्र मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे. त्यानंतर खरा गुलाल उधळु, विजय साजरा करु असे जरांगे पाटील म्हणाले.
मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलन शांतेत पार पडलं. त्याच पार्श्वभूमीवर सगळ्यांचे मला फोनही आले. सर्व जण शांततेत मुंबईला आले व आंदोलनानंतर आपल्या घरी परतले. त्यांचे मनापासून कौतुक. यामध्ये सगेसोयरे हा शब्द फार महत्त्वाचा आहे. त्या शब्दासाठी सरकारने १५ दिवस लावले. हे अध्यादेशाचं परिपत्रक आहे. त्यामुळे याबाबत गाफिल राहून चालणार नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.