बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून काल या प्रकरणाची चौकशी करणारी एसआयटी बरखास्त करून नव्याने स्थापन केल्यानंतर आज वाल्मिक कराड याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. वाल्मिक कराडला मकोका लागवल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. तर धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. वाल्मीक कराडच्या जातीयवादी टोळ्या सांभाळणाऱ्याला महाराष्ट्राच्या समोर आणा तसेच कराडवर ३०२ कलम लावा, अशी मागणी केली आहे.
मनोज जरांगे म्हणाले, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणि पवनचक्की चालकांकडून खंडणी उकळणारे आरोपी एकच आहेत. वाल्मिक कराडला मकोका लावला आता त्याला३०२हीलावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच वाल्मिक कराडची टोळी ही राज्यभर पसरली असून त्या सर्वांवर कारवाई करावी. या टोळीला सांभाळणाऱ्या व्यक्तीला जनतेसमोर आणावं. एका व्यक्तीसाठी संपूर्ण राज्याला वेठीस धरू नका.यांना साथ देणारी टोळी ही राज्यभर पसरलेली आहे.
त्यांना जोपर्यंत कायद्याच्या कचाट्यात पकडत नाही तोपर्यंत उपयोग नाही. या सगळ्यांचा नायनाट केला पाहिजे. यातील एकही आरोपी सुटला नाही पाहिजे. यांना जन्मठेप-फाशीच झाली पाहिजे. या १००-१५० जणांनी राज्य वेठीस धरलं आहे. यांच्या पाठीराख्याची नार्को टेस्ट करा,अशी मागणी जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
वाल्मीक कराडवरमकोका आणि हत्येचा गुन्हा दाखल होणं अपेक्षित होतं, ते गरजेचं होतं. शेवटी जनभावना महत्त्वाची. राज्यातील जनता मुख्यमंत्री फडणवीसांकडे न्याय मागत होती. संघटित गुन्हेगारी करणारी धनंजय मुंडेची ही टोळी आहे. हिचा सफाया करणं गरजेचं आहे, आता मागे हटू नका. तो सरकार चालवत नाही, याचा नायनाट मुळासकट बिमोड करा. धनंजय मुंडेला खूप मोठा भ्रम होता, मी म्हणजे अमृत पिऊन आलो आहे. राज्यात माझ्याच लोकांची मगरूरी करणार,मात्र रावणाचं राज्य टिकलं नाही, तू कोण आहे?’असा निशाणा मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर साधला.
वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल होताच कराडच्या समर्थकांनी परळीमध्ये रस्त्यांवर टायर पेटवल्या आणि परळी बंदची हाक दिली. एका बसवर दगडफेकही करण्यात आल्याचे वृत्त आहे. शहरात तणावाची स्थिती आहे.
संबंधित बातम्या