मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. फडणवीस मला ठार मारण्याच्या प्रयत्न करत असल्याचा खळबळजनक आरोप करत मुंबईतील सागर बंगल्याकडे रवाना झाले. मराठा बांधवांना त्यांना समजावल्यानंतर त्यांनी उपोषण सोडले असून आता त्यांच्या राजकारणातील प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
मी राजकारणात जाणार नाही, निवडणूक लढवणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीच सांगितले आहे. मात्र त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केल्यानंतर भाजपकडून जरांगे यांच्या विधानाचा निषेध केला जात असून त्यांचा बोलवता धनी कोण?, असा सवालही केला जात आहे. आता नागपूरमधील भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी मनोज जरांगे पाटील लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे म्हटले आहे. तसेच ते महाविकास आघाडीचे उमेदवार असू शकतात, असा दावा केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे शरद पवार व उद्धव ठाकरेंची भाषा बोलत असल्याचे म्हटले होते. त्यातच, आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेनादरम्यान, जरांगे यांच्या विधानांची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्याची मागणीही विधानसभेत झाली. त्यानुसार, आता जरांगेंच्या आंदोलन चौकशीसाठी एसआयटी नेमण्यात येणार आहे. जरांगेंच्या आंदोलनामागे राष्ट्रवादी शरद पवार गट असल्याचा आरोप होत आहे. त्यातच, आमदार आशिष देशमुख यांनी जरांगेच्या राजकीय प्रवेशाचा दावा केला आहे.
देशमुख म्हणाले की, शरद पवार गट निवडणुकीच्या जरांगेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे. मनोज जरांगे यांना सुरुवातीपासूनच राजकीय महत्त्वकांक्षा होती, म्हणूनच त्यांनी मराठा आरक्षणाचे आंदोलन उभं केलं आणि इतकं महिने लांबवलं. महाविकास आघाडीच्या बैठकीत बीड लोकसभा जागेसाठी शरद पवार गट आग्रही राहील. या मतदारसंघातून मनोज जरांगे यांना उमेदवारी दिली जाईल. त्याचबरोबर शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे सातत्याने मनोज जरांगे यांना भेटून आंदोलनाची दिशा निश्चित करत होते, असा आरोपही आशिष देशमुख यांनी केला आहे.
याआधी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही जरांगेंना लोकसभा निवडणूक लढवण्याचं आवाहन केलं होतं. मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे अजूनही सर्व मराठा समाज आहे. काँग्रेस असो की भाजप या दोघांनाही मतदान करू नका असे आवाहन त्यांनी समाजाला करावे. तसेच जरांगे यांनी स्वतः जालना जिल्ह्यातून अपक्ष निवडणूक लढवावी, असे आवाहन आंबेडकर यांनी केलं आहे.
दरम्यान, मनोज जरांगे हे मूळ बीड जिल्ह्यातील रहिवाशी आहेत, त्यांच्या आंदोलनास बीडमधून मोठा पाठिंबाही मिळाला. त्यामुळे, बीड जिल्ह्यातून त्यांच्या उमेदवारीची चर्चा होत आहे.