मराठा आरक्षण व सगेसोयऱ्यांच्या मागणीवरून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा आरक्षण द्यायचं आहे, त्यांना सगेसोयऱ्यांच्या मुद्दा मान्य आहे. पण देवेंद्र फडणवीस यांचा त्यांना विरोध असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला होता. त्यावर असं काही सिद्ध झाल्यास आपण राजीनामा देऊ आणि राजकारणातून निवृत्त होऊ असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं.त्यानंतर आता मनोज जरांगे यांनीहीआपल्या आरोपांचा पुनरुच्चार करत देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा आरक्षण रोखून धरला असल्याचा दावा केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याचं आव्हान दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्ही तुम्हाला विरोधक मानलेलं नाही. मात्र तुम्ही समजून घेत नाही. तुमच्यावर राजीनामा देण्याची भाषा बोलण्याची वेळ का आली? सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्ही रोखलीय, हे तुम्ही नाकारून चालणार नाही, शेवटी तुम्ही या राज्यातील कर्ते आहात. आता तुम्ही इतक्या हताशपणे राजीनामा देईन, असं म्हणायला लागलात. मराठ्यांविरोधात गेल्याचा पश्चाताप तुम्हाला झाला आहे. तुम्ही राजीनामा देईन म्हणताय, तर माझी तुम्हाला विनंती आहे. मी कुठलंही आढवेढं घेत नाही, राजकीय भाषा बोलत नाही. तुम्ही राज्याचे कर्ते आहात. तुम्ही मराठ्यांचं आरक्षण रोखलंय, ते तुम्ही देऊन टाका,असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
मराठा आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी रोखून धरल्याचा आरोप केल्यानंतर फडणवीस म्हणाले की, जरांगे यांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे, हे मला माहिती आहे. पण राज्याचे सगळे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतात इतर सर्व मंत्री मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकारातून काम करतात. मी व शिंदे साहेब एकत्रितपणे काम करतो. त्यांना माझा पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ आहे. त्यामुळे आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारावं.
फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी जर सांगितलं की मराठा आरक्षणाचा निर्णय घेताना मी थांबवलं तर मी पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातून निवृत्त होईल, असं आव्हान फडणवीसांनी दिलं. आतापर्यंत मराठा समाजासाठी मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतले आहेत.