शेजारील देश बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून देश राजकीय दृष्ट्या अस्थिर झाला आहे. आज बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा देऊन देशातून परागंदा व्हावं लागलं आहे. त्याचबरोबर बांगलादेशाची सत्ता लष्कराच्या हातात गेली आहे. बांगलादेशच्या घटनेवरून सरकारने धडा घ्यावा, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. बांगलादेशपेक्षा जास्त मस्ती यांना आली आहे, पण महाराष्ट्रात असं काही होणार नाही, असंही जरांगे म्हणाले आहेत.
राज्यात दंगली घडल्या पाहिजे, अशी सत्ताधाऱ्यांची इच्छा आहे. ओबीसी आमच्या अंगावर घालतात. मात्र आम्ही मराठा समाज राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू देणार नाही.
धाराशिवमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यावरही मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांचे नाव न घेता जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आंदोलकांनी कोणालाही किंमत देऊ नये.त्यांच्यासमोर आंदोलन करण्याचे आणि त्यांना भेटायची काय गरज आहे, असा सवालही त्यांनी केला. गोरगरीब जनतेशी खेळणारे हे लोक असून आरक्षण कशासाठी लागतं हे त्यांना माहिती नाही, हे पैशावर झोपणारे लोक असून यांना आरक्षणाचं काय कळणार आहे? त्यांना गोरगरिबांच्या भावना काय कळणार?ते आमच्या भावनेशी खेळत आहेत, मात्र मराठ्यांनी तसल्याला किंमत देऊ नये,कुणालाही विचारायला जाऊ नये,असं म्हणत जरांगेंनी राज ठाकरेंवर टीका केली.
दरम्यान मनोज जरांगे हा शरद पवारांचा माणूस असल्याच्या प्रकाश आंबेडकरांच्या टीकेवर जरांगे म्हणाले की, मी प्रकाश आंबेडकर यांचा आदर करतो. त्यांनी आमची हाक ऐकली पाहिजे. राजकारण्यांना दाबायची हीच संधी आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांनी राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलवर जाऊन मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका विचारली. त्यावेळी राज ठाकरे म्हणाले, मी मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेटून चर्चा करणार आहे. मला वाटते मराठा आरक्षण मिळणे शक्य नाही. त्यासाठी घटनेत बदल करणे आवश्यक आहे. सध्या तुमची माथी भडकवण्याचं काम केलं जात आहे. शरद पवार यांना हे सगळं माहिती आहे. मग शरद पवार केंद्राकडे का बोलत नाही? ओबीसी नेते व मराठ्यांमध्ये वाद निर्माण केला जात आहे. मी याबाबत मनोज जरांगे पाटीलांशी आधी फोनवर बोलतो. त्यानंतर चर्चा करून कळवतो. ज्या गोष्टी होतील,त्याला माझा पाठिंबा आहे,ज्या होणार नाही त्याला विरोध असेल,अशी आपली भूमिका असल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.