मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी आजपासून (२० जुलै) पुन्हा एकदा उपोषण सुरू केले असून सगेसोयऱ्यांच्या वचनाची पूर्ती करा आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी १७ दिवस उपोषण करणार आहेत. त्यानंतर राज्यव्यापी दौरा करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. दरम्यान मनोज जरांगे यांनी राज्यात सध्या चर्चेत असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरूनसरकारवर निशाणा साधत जोरदार हल्लाबोल केला आहे. लाडकी बहीण, लाडका भाऊ आणि आता लाडकी मेव्हणी योजनाही सरकार आणले,असा खोचक टोला मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला लगावला.
जरांगे पाटील म्हणाले की,शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने कागदपत्रे काढण्यासाठी विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयात जावे लागते. उत्पन्नाचा दाखला तसेच अन्य महत्त्वाची कागदपत्र काढण्यासाठी गर्दी होत आहे. महसूल कर्मचाऱ्यांचा संपही सुरू आहे. त्यातच सरकारने लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजना आणली आहे. यात सरकारचे दोन डाव दिसतात. एक म्हणजे या योजनेतून मतदान विकत घेण्याचा प्रयत्न आणि दुसरे म्हणजे निवडणूक झाल्यानंतर योजना गुंडाळून टाकायची. आशा कितीतरी योजना आल्या आणि गेल्या, अशी टीका जरांगे यांनी केली.
जरांगे म्हणाले मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही, धनगरांना आरक्षण द्यायचे नाही. लक्ष वळवण्यासाठी नवीन काहीतरी योजना आणायच्या तोपर्यंत आचासंहिता लागतात. लाडकी बहीण, लाडका भाऊ, आता लाडकी मेहुणी-लाडका मेहुणा योजना आणतील. सरकारने हा डाव टाकलेला आहे. तुम्ही दिलेले १५०० रुपये किती दिवस २ ते ३ दिवस पुरतील. मात्र जर आरक्षण दिले, तरुणांना रोजगार दिला, मुलींना मोफत शिक्षण दिलं तर हे आम्हाला आयुष्याला पुरणार आहेत.
सरकारने मराठवाडा वैधानिक महामंडळाला मंजूर केलेला २० हजार कोटींचा निधी अजून दिलेला नाही, समृद्धी, शक्ती महामार्गात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही, अनेक माता-भगिनीचे सरकारी पेन्शनचे पैसे वेळवर जमा होत नाहीत, आणि आता ही लाडकी बहीण योजना आणली आहे. मी योजनेवर टीका करत नाही, मात्र यामुळे विद्यार्थ्यांना दाखले काढायला अडचण येत आहे. सरकारने मराठ्यांना धोका दिल्याने पुन्हा एकदा उपोषणाची वेळ आली आहे. सगेसोयरेची अंमलबजावणी करा, गुन्हे मागे घ्या, तीनही गॅझेट लागू करा. मराठ्यांवरील गुन्हे मागे घेतो म्हणाले पण आज ११ महिने झाले तरी गुन्हे मागे घेतलेले नाही.
लाडकी बहीण योजनेवर टीका करताना जरांगे यांनी एका माजी महिला खासदाराचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, मी कुणाचेही नाव घेत नाही. पण मागे एकदा एक महिला खासदार निवडणुकीच्या प्रचारात पिछाडीवर होती. त्यांच्या विरोधात माजी खासदार उभे होते. तेही मातब्बर होते. यामुळे महिला खासदाराने संपूर्ण जिल्ह्यात साडी आणि मंगळसूत्राचे वाटप केले. यामुळे महिला त्या खासदाराचे गुणगाण करू लागल्या. यामुळे महिला आणि पुरुष मतदारांमध्ये विभागणी झाली. घराघरात कलह निर्माण झाले होते. याप्रकारे आता लाडकी बहीण,लाडका भाऊ योजनेतून तीच तयारी सुरू आहे. मराठा, ओबीसी, धनगर बांधवांना आपापसात लढवून यांची लाडकी योजना सुरू आहे. कदाचित ते लाडकी मेव्हणी योजनाही आणतील.
संबंधित बातम्या