Manoj jarange Meet Dhananjay Munde : केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण अजूनही तापलेलंच आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मु्ंडे यांच्यावर सातत्याने टीका सुरू असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहेत. त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हे हत्या व खंडणी प्रकरणात तुरुंगात आहेत. दरम्यान मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे मला भेटण्यासाठी आले होते, त्यांनी आपली मध्यरात्री भेट घेतल्याचा दावा जरांगे पाटलांनी केला आहे.
धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड मला भेटण्यासाठी आले होते, असा दावा जरांगे यांनी केला आहे. मला मराठ्यांनी मोठं केलंय, मलासांभाळा असं मुंडे म्हणाल्याचंही जरांगे यांनी म्हटलं आहे. जरांगे पाटील यांनी म्हटले की, विधानसभा निवडणुकीच्या आधी धनंजय मुंडे मला भेटायला येणार होते. तसे निरोप त्यांच्याकडून मला ७ ते ८ वेळा आले होते. मात्र मला भेटायला येणाऱ्या लोकांच्या गर्दीमुळे काही वेळा तेअर्ध्या वाटेतून माघारीही गेले होते. त्यानंतर एक दिवस ते रात्री दोन वाजता अंतरवालीला आले. त्यावेळी मी झोपलो होतो.
मात्र एक-दोन तास झाले तरी ते काही तिथून गेले नाहीत.तेव्हाआमच्या लोकांनी मला झोपेतून उठवलं आणि सांगितलं की तुम्हाला भेटल्याशिवाय जाणार नाही, असं धनंजय मुंडे म्हणत आहेत. आम्ही काही जातीयवादी लोक नाही, त्यामुळे मी त्यांना भेटलो. त्यावेळी त्यांच्यासोबत वाल्मीक कराडही होता. त्यांना भेटण्याची इच्छा नसतानाही मी त्यांना भेटलो. कराडला पाहताच आपण हाच शेतकऱ्यांचे हार्वेस्टींगचे पैसे खाणारा आहे का, असेही विचारल्याचे जरांगे यांनी म्हटले.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना तपास यंत्रणा सोडणार नाहीत. आरोपींची ही टोळी धनंजय मुंडे यांची असल्याचा आरोप जरांगे यांनी केला.
हार्वेस्टर खरेदीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक झाली होती, असे शेतकरी माझ्याकडे आल्यानंतर मी धनंजय मुंडे यांच्या जवळच्या व्यक्तीला फोन करून याचा जाब विचारला होता, असं मनोज जरांगे यांनी सांगितलं. त्या शेतकऱ्यांना मारहाणही झाली होती. त्यांनी वाल्मीक कराज व धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले होते. मी याबाबत मुंडे यांच्या कार्यकर्त्याला फोन लावल्यानंतर या शेतकऱ्यांना परळीत बोलावून घेण्यात आलं होतं.
संबंधित बातम्या