मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी या गावात पुन्हा उपोषणाला बसले आहेत. तर आंतरवाली गावच्या वेशीवरच लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात ओबीसी समाजातील लोकांनी उपोषण सुरू केलं आहे. त्याचबरोबर राज्यात इतर ठिकाणी देखील ओबीसींचे आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात चालू असलेली ओबीसी आंदोलनं हे सरकार पुरस्कृत आहेत,असा आरोप जरांगे यांनी केला आहे.
जरांगे पाटील म्हणाले,आम्ही जसे आंदोलन करत आहोत,तसाच ओबीसींना देखील आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आम्ही कोणाला रोखणार नाही,रोखू शकत नाही. त्यांनी त्यांचं आंदोलन करावं,आम्ही आमचं आंदोलन चालू ठेवू. मिळालेल्या आरक्षणाला धक्का लावू शकत नाही,ते आमचे विरोधक नाहीत,एससी एसटी आरक्षणाला धक्का तर लागणारच नाही. आम्ही ओबीसीमधून आरक्षण घेणार,असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
त्याचबरोबर जरांगे यांनी ओबीसी आंदोलनाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरहे सरकार कोंडीत सापडलेलं नाही. तर सरकारच हे आंदोलन उभं करत आहे. आमचं आमच्यात भांडण लावून देत आहे का?आमच्या मागण्या लांबणीवर टाकायला सरकार असं तर करत नाहीना?असे प्रश्न उपस्थित करत,ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत वाटतंय असं जरांगे यांनी म्हटलं आहे. मात्र आमची तारीख१३जुलै असल्याचं जरांगे म्हणाले.मुळात गावखेड्यातले ओबीसी आणि मराठा बांधव एकच आहेत. परंतु,सरकार त्यांच्यात भांडण लावून स्वस्थ बसतंय.
ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत असू शकतं,अन्यथा असं अचानक घडलं नसतं. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण मिळण्याच्या वेळीच असं कसं काय घडलं?परंतु,मी १३ जुलैपर्यंत काही बोलणार नाही. मी माझं आंदोलन चालू ठेवणार आहे. आम्ही कोणाला आंदोलन करण्यापासून रोखू शकत नाही. तेही आम्हाला रोखू शकत नाहीत. आमच्यावर दादागिरी केली जात आहे. मात्र आम्ही कोणाला रोखणार नाही. कारण आंदोलन करण्याचा अधिकार लोकशाहीने सर्वांनाच दिला आहे.
दरम्यान राज्यात ओबीसी आंदोलन उभं राहिल्यानं सरकार कोंडीत सापडल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे सरकारने मराठा समाजाला लोकसभा निवडणुकीपूर्वी जी आश्वासनं दिली होती ती आता लांबणीवर पडू शकतात. सरकारने मराठा समाजाच्या बाजूने निर्णय घेतला तर ओबीसी समाज नाराज होईल आणि ओबीसींच्या बाजूने निर्णय घेतला तर मराठा समाज नाराज होण्याचा धोका आहे. त्यामुळे सरकार कोणा एकाच्या बाजुने निर्णय घेऊ शकणार नाही.