Manoj Jarange Patil News: जालना जिल्हा प्रशासनाने वाळू माफिया आणि गुन्हेगारांच्याविरोधात कारवाईचा बडगा उचलला आहे. याप्रकरणी ९ जणांविरोधात तडीपारीची कारवाई करण्यात आली, यात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर याचाही सामवेश आहे. मेहुण्यावर झालेल्या तडीपारीची कारवाईनंतर जरांगे पाटलांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. हे १०० टक्के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे षडयंत्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अंबड उपविभागीय न्याय दंडाधिकारी यांच्या आदेशानंतर वाळू प्रकरणासह इतर गुन्ह्यातील नऊ आरोपींना जालनासह बीड, परभणी आणि छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले. तडीपारीची कारवाई झालेल्या आरोपींविरोधात जालन्यातल्या अंबड, घनसावंगी आणि गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे दाखल झाले आहेत. सदर आरोपींवरती वाळू चोरी, जीवे मारण्याचा प्रयत्न, अंतरवाली सराटीच्या आंदोलनात केलेली जाळपोळ यासह सरकारी कामात अडथळा आणण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे गुन्हे २०१९ पासून वेगवेगळ्या प्रकरणात दाखल करण्यात आले आहे.
मेहुण्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आल्यानंतर मनोज जरांगे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. सरकारने माझे तोंड बंद करण्यासाठी मुद्दाम माझ्या पाहुण्यारावळ्याचे नाव तडीपारीच्या यादीत घुसवले असावे. हे १०० टक्के देवेंद्र फडणवीस यांचे षडयंत्र आहे. माझ्या बापाने जरी चुकीचे काम केले तरी सोडणार नाही, पाहुण्यांचा तर विषयच संपला, असे जरांगे पाटील म्हणाले.
- विलास खेडकर विरोधात अवैध वाळू वाहतूक आणि वाळू चोरीचे आरोप आहेत.
- दरम्यान, २०२१ मध्ये त्यांच्यावर ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू वाहतूक केल्याचा आरोप होता. याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- २०२३ मध्ये जालन्यातील शहागड इथे बस जाळल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात ३०७, ३५३ आणि ४३५ या कलमान्वये गुन्हा दाखल आहे
- गोदावरी नदीतून जवळपास ५ लाख रुपयांची वाळू चोरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- नंतर गोदावरी नदीतून केणीच्या मदतीने ५०० ब्रास वाळू चोरल्याप्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
विलास हरिभाऊ खेडकर, केशव माधव वायभट, संयोग मधुकर सोळुंके, गजानन गणपत सोळुंके, अमोल केशव पंडित, गोरख बबनराव कुरणकर, संदीप सुखदेव लोहकरे, रामदास मसूरराव तौर, वामन मसुरराव तौर आदींवर तडीपारीची कारवाई झाली आहे.
संबंधित बातम्या