मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शुक्रवारी सकाळी सरकार आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यात चर्चा झाली होती. पण, अध्यादेश काढेपर्यंत मुंबई सोडणार नसल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. आजचा मुक्काम हा वाशीत असणार आहे मात्र सरकारने उद्यापार्यंत अध्यादेश काढला नाही तर आझाद मैदानाकडे निघणार व एकदा आझाद मैदानाकडे निघाल्यास माघारी फिरणार नसल्याचा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे.
सरसकट आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. सगसोयरे या शब्दावर आम्ही ठाम असून सरकारने सगेसोयरे शब्दाचा अध्यादेश काढवा. त्यानुसार, सगसोयऱ्यांकडून शपथपत्र लिहून घेतल्यानंतरच संबंधित कुटुंबाला आरक्षणाचं प्रमाणपत्र द्यावं, असेही जरांगे यांनी म्हटलं. सरकारने आज रात्रीपर्यंत अध्यादेश काढावा, अशी मागणीही त्यांनी केली. अध्यादेशासाठी सरकारला उद्या १२ वाजेपर्यंत मुदत देतो. त्यानंतर आझाद मैदानाकडे जाणार आहे. अध्यादेश काढल्यास गुलाल उधळायला अन् अध्यादेश न काढल्यास उपोषण करण्यासाठी जाणार. मात्र काही झाले तरी आझाद मैदानावर जाणारच असे जरांगे म्हणाले.
जरांगे म्हणाले की, कुणबी दाखल्याची एक नोंद जरी सापडली तरी ७० ते १०० जणांना त्याचा लाभ मिळत आहे. यामुळे २ ते अडीच कोटी मराठ्यांना लाभ मिळणार आहे. ओबीसी प्रमाणपत्रासाठी आपल्याला अर्ज करणे गरजेचे आहे. गावागावात ज्यांची नोंद मिळाली आहे, त्यांनी अर्ज करण्यास सुरूवात करा, असेही जरांगे पाटील म्हणाले आहेत.
आंतरावली सराटीसह राज्यातील सर्व ठिकाणचे मराठा आंदोलकांवरचे गुन्हे सरकारने मागे घेण्याची मागणी केली होती. मात्र तसे पत्र सरकारने दिले नाही. मराठा समाजाला पूर्णपणे १०० टक्के आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सर्वच क्षेत्रातील शिक्षण मोफत करा. त्यासोबत, सरकारी नोकरीतील जागांची भरती सरकारने करु नये, जागांची भरती करायची असेल तर मराठा समाजाच्या जागा रिक्त ठेऊन भरती करावी, अशी मागणीही जरांगे यांनी वाशीतील सभेतून केली आहे.