मराठा समाजासाठीआरक्षणाची मागणी करणारे कार्यकर्ते मनोज जरांगे (Manoj jarange ) यांनी मागणी केली की, सत्ताधारी भाजपने स्पष्ट करावे की, ते मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देणार आहेत की नाही. मराठा आरक्षणावर विरोधी पक्षांना भूमिका मांडण्यास का सांगितले जात आहे? भाजपला स्पष्ट करावे लागेल की, मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळणार की नाही. मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर मराठा व्होट बँकेचा वापर केल्याचा आरोप लावला.
दरम्यान अमित शहांनी मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांवर टीका केली. याबाबत विचारले असता जरांगे म्हणाले ते मोठी लोकं आहेत, त्यांना महाराष्ट्रातून मराठा जातच संपवायची आहे, असा गंभीर आरोपही जरांगे यांनी केला आहे.
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी जालन्यातील आंतरवली सराटीमध्ये तिसऱ्यांदा उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा ओबीसी नेते व मंत्री छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला. त्याचबरोबर अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर भाष्य करताना त्यांच्यावर मराठा जात संपवण्यासाठी प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
अमित शहांनी मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांवर आरोप केले. याबाबत मनोज जरांगे यांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले की, ते मोठे लोक आहेत, त्यांना केवळ सत्ता मिळवण्यासाठी गरिबांची गरज असते. एकदा सत्ता स्थापन केली की, ते गरिबांना विचारत नाहीत. मोदी निवडणुकीआधी शिर्डी दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांच्याकडून आरक्षणाबाबत ठोस निर्णयाची अपेक्षा होती, मात्र त्यांनी याबाबत ब्र शब्द काढला नाही.
जरांगे म्हणाले, मोदी-शहांना देशातील मोठ्या जाती संपवायच्या आहेत, महाराष्ट्रात सर्वात मोठी जात असलेली मराठा जात त्यांना संपवायचीय. गुजरातमध्ये पटेल आहे, यादव, गुज्जर, जाट, मुसलमान, दलित या मोठ्या जाती त्यांना संपवायच्या आहेत, असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला. मोठ्या जाती जर एकत्र आल्या तर काय होतं हे त्यांना समजलं असल्याचा टोलाही जरांगे यांनी लगावला.
मनोज जरांगे म्हणाले की, आम्हाला राजकारणात यायचं नाही. मात्र जर मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात अपयश आलं, तर आम्हाला राजकारणात यावं लागेल. आमच्यासमोर त्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
संबंधित बातम्या