मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या आंदोलनचा आज १६ वा दिवस असून आज त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात अत्यंत आक्रमक पवित्रा घेत मुंबईतील सागर बंगल्यावर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. जरांगे जालन्यातून मुंबईकडे निघताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस व अजित पवार यांच्यात बैठक झाली. यामध्ये राज्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी चर्चा झाल्याचे समजते. तसेच मनोज जरांगे पाटील यांची समजूत कशी काढायची? यावरही खल करण्यात आला. जरांगे पाटील यांच्या मागे किती मराठा समाज आहे, यावर सरकारची पुढील दिशा ठरणार असल्याची माहिती मिळाली आहे.
मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे यांना भोवळ आल्याने काही अंतरावर थांबले. गावकऱ्यांकडून रुमालने हवा देण्याचा प्रयत्न झाला. तुमची प्रकृती ठीक नाही, त्यामुळे तुम्ही पायी चालू नका, अशी वनंती गावकऱ्यांनी केली.
मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर उपोषण करणार असल्याची घोषणा केली असून मुंबईकडे रवानाही झाले आहेत. मराठा बांधव आणि महिलांनी मनोज जरांगे यांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने जाण्यावर ठाम होते. रस्त्यातच पायी जाताना जरांगे यांना भोवळ आली व ते रस्त्यातच कोसळल्याची माहिती आहे.
मनोज जरांगे मुंबईकडे रवाना होताच पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सीमेवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामुळे पोलिसांकडून जालना आणि छत्रपती संभाजीनगर सीमा भागात बॅरिकेट लावण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. मनोज जरांगे यांच्या मुंबईच्या दिशेने जाण्याच्या निर्णयानंतर पोलीस यंत्रणा सजग झाली आहे. मनोज जरांगे हे पैठण-बीडकिन-गंगापूर-वैजापूर-येवला-नाशिक-ठाणे या मार्गावरून जाणार आहेत.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचे शांततेत ५६ मोर्चे झाले. त्यावेळेस कुठंही दगडफेक व आगी लावल्याच्या घटना घडलेल्या नाहीत. जरांगे पाटील आता जी भाषा आहे ती राजकीय आहे. त्यांच्या मागे कोणीतरी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.