मराठा कुणबीच्या २९ लाख नोंदी सापडल्या; अजून सापडतील, जरांगे पाटलांचा दावा
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी खोपोलीतील सभेत दावा केला की, राज्यात २९ लाख कुणबी मराठा नोंदी सापडल्या असून अजूनही सापडतील.
मराठ्यांच्या चेहऱ्यावर हसू पहायचे आहे. त्यामुळे जिवाची पर्वा न करता मी या लढ्यात उतरलो आहे. मराठा समाजाला आरक्षण दिल्या शिवाय राज्यसरकारची सुटका नाही. ज्या राज्यात मराठा समाजाला आरक्षणासाठी नोंदी सापडत नव्हत्या,तिथे आज २९ लाख नोंदी सापडल्या आहेत. अजूनही सापडत आहेत. असा दावा मराठा आंदोलनाचे संघर्षकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी खोपोली येथे केला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
खोपोली येथील सभेत बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, काही झाले तरी मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे.सरकारने २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही दिले तर २५ डिसेंबरच्या नंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल. त्याआधी १ डिसेंबर पासून गावागावात साखळी उपोषणाची तयारी करा, असे आवाहन त्यांनी मराठा समाजबांधवांना केले आहे.
मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असून पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहे. गेल्या ७० वर्षात पुरावे सापडत नव्हते ते आता प्रत्येक जिल्ह्यात सापडत आहेत. यामध्ये १८०५ पासून १९६७ पर्यंतच्या जुन्या नोंदीचा समावेश आहे. कुणबी नोदींचा पहिला अहवाल सरकारने स्वीकारला आहे, दुसरा तयार होत आहे. ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांना दाखल्यांचे वाटप केले जाईल. त्यामुळे आता मागे हटू नका.
मागील ७० वर्षात आरक्षण नसल्यामुळे मराठा समाजाचे मोठं नुकसान झाले आहे. यापुढे होऊ देणार नाही. आरक्षणासाठी अशी संधी पुन्हा मिळणार नाही. कच खाऊ नका,आरक्षणासाठी एकजूट ठेवा,राजकारण बाजूला ठेवा,आत्महत्या करू नका,जाळपोळ करू नका,मी तुमच्या जिवावर लढतोय. सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ,शांततेच्या आंदोलनात ताकद मोठी आहे,कायदा व सुव्यवस्था बिघडू देऊ नका,ओबिसींशी समाज बांधवांशी वाद घालू नका. भांडू नका. राजकीय स्वार्थासाठी तणाव निर्माण होऊ देऊ नका, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.