मराठा आरक्षणासाठी गेल्या वर्षभरापासून आवाज उठवणारे मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. जिथं त्रास दिला आहे, त्याला पाडून बदला घ्यायचा, अशी रोखठोक भूमिका घेत मनोज जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अर्ज माघारी घेण्याचा ४ नोव्हेंबर (सोमवार) शेवटचा दिवस आहे. ठराविक जागांवर जरांगे यांनी उमेदवार उभे केले आहेत.
आमच्या ताकदीवर लढता येतील अशा मतदारसंघाबाबत आम्ही सकाळपासून चर्चा केली. राज्यात पहिल्यांदा उमेदवारांना प्रत्यक्ष बोलून मतदारसंघ विचारले असतील. एससी, एसटी जागेवर उमेदवार देणार नाही. जिथे उमेदवार देणार नाही, तिथं विरोधक असलेल्यांना पाडायचं. जिथे उभे करायचे नाही तिथे आपल्या विचाराच्या उमेदवाराला बॉण्ड आणि व्हिडिओ घेऊन त्याला पाठिंबा द्यायचा आहे. तसेच तो व्हिडिओ व्हायरल करणार नाही. असं जरांगे पाटील म्हणाले. अंतरवाली सराटीतील पत्रकार परिषदेत बोलत होते. शिवाय आज रात्रीत उमेदवारांची घोषणा करणार असल्याचेही जरांगेंनी स्पष्ट केलं.
एका जिल्ह्यात एक उमेदवार देणार आहोत, बाकी पाडणार आहोत. आमचे १०-१५ उमेदवार तर २ ते ३ मुस्लिम आणि दलितांना संधी देणार असल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलं आहे. तसंच मुंबईतल्या ३६ जागांपैकी २३ ठिकाणी उमेदवार पाडणार असल्याचं जरांगे म्हणाले.